रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराची अद्यापही प्रतीक्षा !
रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, यावर आपण आजही ठाम आहोत, अशी भूमिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. याविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घेतला जाईल, तो मान्य असेल, असेही सामंत यांनी या वेळी स्पष्ट केले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ उद्योजक किरण सामंत यांनी त्यांच्या सामाजिक माध्यमावरून ‘मा. नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान आणि ‘अब कि बार ४०० पार’ होण्याकरता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून माघार घेत आहोत’, अशा आशयाची पोस्ट प्रसारित केली होती. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.
मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, किरण सामंत हे भावनिक आहेत, संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांनी २ एप्रिलच्या रात्री नऊ वाजता ‘पोस्ट’ केली होती; परंतु त्यांना समजावून सांगितल्यावर त्यांनी ती ‘पोस्ट’ पुसून टाकली. (डिलिट केली.)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा महायुतीच्या उमेदवारीवरून प्रतिदिन वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. कोकण विभागात भाजपला जागा नसल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, तर विद्यमान खासदार शिवसेनेचे असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटानेही या जागेवर दावा केल्याने किरण सामंतही या जागेसाठी इच्छुक आहेत. तशी सिद्धताही त्यांनी या मतदारसंघात चालू केली आहे. लोकांच्या गाठी-भेटी गाव-दौरे चालू केले आहेत; मात्र या जागेचा प्रश्न अद्याप तरी सुटलेला नाही.