|
धुळे – दोंडाईचातील संशयितावर हद्दपारीची कारवाई टाळण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी करून नंतर दीड लाख रुपयांवर तडजोड करत ती रक्कम लाच म्हणून घेणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या घरात अनुमाने सव्वादोन कोटी रुपयांचा ऐवज सापडला आहे. यांत ६० लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे आणि दागिने, तसेच ७७ सहस्र रुपये किमतीची चांदीची भांडी आणि दागिने यांचा समावेश आहे. यासह शिंदे यांचे कुटुंबीय आणि नातलग यांच्या नावाने असलेल्या १ कोटी ७५ लाखांच्या मालमत्तेचे दस्तऐवज सापडले आहेत. त्यांचा एकत्रित आकडा हा अनुमाने २ कोटी ३५ लाख रुपयांपर्यंत आहे. ही सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
दीड लाख रुपये लाच घेतांना हवालदार नितीन मोहने आणि अशोक पाटील यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेऊन गुन्हा नोंदवला. न्यायालयाने तिघांना २ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तिन्ही पोलिसांच्या घराची झडती घेण्यात आली असून त्यांच्या निकटवर्तियांचीही चौकशी चालू आहे.
संपादकीय भूमिकालोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस ! असे लाचखोर पोलीस अधिकारी गुन्हे शाखेत असतील, तर गुन्ह्यांचे प्रमाण कधीतरी उणावेल का ? |