सनातन संस्थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण करणारे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा धुळे, जळगाव जिल्हा दौरा पार पडला !

जळगाव, २ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे आहेत. सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. समाजाच्या आध्यात्मिक सेवेची ही २५ वर्षे आहेत. समाजाला आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणार्‍या सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष हे समाजाला आनंददायी बनवण्याचे संस्थेने ठरवले आहे. ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म’ आदी विविध विषयांवरील प्रवचने, कार्यशाळा, अध्यात्माचे अभ्यासवर्ग, साधना सत्संग, बालसंस्कारवर्ग आदी उपक्रमांच्या माध्यमातून संस्था समाजाभिमुख कार्य करत आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ते २९ ते ३१ मार्च या कालावधीत ते जळगाव, धुळे जिल्हा दौर्‍यावर होते.

श्री. चेतन राजहंस

२९ मार्च या दिवशी सनातनच्या जळगाव येथील सेवाकेंद्रात ‘तणावमुक्त जीवन कसे जगावे ?’, या विषयावर अधिवक्त्यांसाठी, ३० मार्च या दिवशी सानेगुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ, धुळे येथे अधिवक्त्यांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. याचा अनेकांनी लाभ घेतला. ३१ मार्च या दिवशी ‘तणावमुक्त जीवन कसे जगावे ?’, या विषयावर जळगावमधील औद्योगिक विकास महामंडळ परिसरात उद्योगपतींसाठी कार्यशाळा घेण्यात आली. यालाही अनेक जण उपस्थित होते.

३१ मार्च या दिवशी जळगावमधील व्यावसायिक नीलेश पवार यांच्या कार्यालयात ‘पत्रकार – संपादक मुक्त संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री. चेतन राजहंस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांनी मुक्तपणे संस्थेचे उपक्रम, उद्देश, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), शैक्षणिक धोरणात पालट करण्याची आवश्यकता, महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी असतांना सर्रासपणे चालू असलेली गोहत्या आदी विषयांवरील प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले. वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेचे साधक श्री. वसंत पाटील यांनी केले.