गायरान भूमी मिळत नसल्याने योजना राबवण्यात अडचणी !
पुणे – मार्च अखेरपर्यंत सर्व घरांमध्ये घरपोच पाणी देण्याच्या ‘जलजीवन मिशन’ योजनेच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये सरकारी गायरान भूमी मिळत नसल्याने योजनांच्या कार्यवाहीमध्ये अडथळे येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी योजना पूर्ण होण्यास विलंब होत आहे. मार्चअखेरपर्यंत ‘हर घर जल’ या योजनेद्वारे घरपोच पाणी देण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक गावाला पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्यांची कामे वेगाने चालू होती; मात्र अनेक ठिकाणी योजना राबवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
जलवाहिनी टाकण्यासाठी सरकारी गायरान भूमीची आवश्यकता आहे; मात्र ती उपलब्ध होत नसल्याने योजना चालू होण्यास विलंब होत आहे. पुणे जिल्ह्यात २३० ठिकाणी पाटबंधारे, जलसंधारण, वन विभाग, ग्रामपंचायत यांच्या खासगी, तसेच इतर प्रकल्पांतील सरकारी गायरान जागा हव्या आहेत. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात ६७ ठिकाणी, शिरूर तालुक्यात ४७ ठिकाणी जागांसाठीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. पुणे जिल्ह्यातील १ सहस्र २४० पैकी १ सहस्र २०५ ठिकाणी योजनांची प्रत्यक्षात कामे चालू झाली आहेत. उर्वरित कामे मार्चपर्यंत पूर्ण होणार नसल्याने आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळण्याची शक्यता अधिकार्यांनी वर्तवली आहे.