पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे नाथवंशजांमधील वाद पुन्हा उफाळला !

छबिना मिरवणूक ४ घंटे रखडली !

छत्रपती संभाजीनगर – १ एप्रिलच्या मध्यरात्री नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या छबिना मिरवणुकीच्या वेळी जिल्ह्यातील पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या वंशजांमधील वाद उफाळून आला. नाथांच्या पादुका ठेवण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे छबिना मिरवणूक ४ घंटे रखडली. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पहाटे ४ वाजता मिरवणूक पार पडली.

१. नाथांच्या १३ व्या वंशजांमधील पुढील पिढीतला हा वाद असल्याचे सांगितले जात आहे.

२. पैठण येथील स्थानिक ज्येष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार संत एकनाथांच्या २ पादुका पैठण येथे आहेत. एक पादुका विजयी विठ्ठल असलेल्या मुख्य मंदिरात आहेत, तर दुसर्‍या पादुका या वंशजांमधील १३ व्या पिढीतील रंगनाथबुवा उपाख्य भैय्यासाहेब महाराज गोसावी यांच्या पुढच्या पिढीकडील घरातील देवघरात आहेत.

३. घरातील पूजेतील या पादुका छबिना मिरवणुकीत ठेवून त्या नगरभर मिरवत आणल्या जातात. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा असल्याचे सांगितले जाते; मात्र त्या पादुका ठेवण्यास वंशजांमधील एका गटाने विरोध केला. त्यावरून वाद उफाळून आला.

४. अखेर पादुकांऐवजी नाथ महाराजांची प्रतिमा ठेवून छबिना मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये प्रशासनाची कसरत झाली.

५. पैठण येथे ३ दिवसांपासून नाथषष्ठी सोहळ्याचा उत्सव पार पडत आहे. २ एप्रिल या दिवशी काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली.

६. या सोहळ्यासाठी राज्यभरातून ६५० हून अधिक लहान-मोठ्या दिंड्या आल्या असून लाखो वारकरी आणि भाविक येत असल्याने प्रशासनाकडूनही सर्व चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

७. यंदा नाथषष्ठी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाथ वंशजांतील एका गटाने त्यांच्यातील वाद मिटल्याचे पत्रकार बैठक घेऊन घोषित केले होते; पण दुसर्‍या गटाने ‘वाद मिटले नाहीत’, असे पत्रक प्रसिद्ध करून स्पष्ट केले होते.