दमास्कस (सीरिया) – इस्रायलने सीरियातील इराणच्या दूतावासावर हवाई आक्रमण केले. यात दूतावासाचा काही भाग उद्ध्वस्त झाला आहे. त्यातील सर्व जण ठार झाले आहे. ही संख्या ६ हून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. यात इराणचे सैन्य सल्लागार जनरल अली रझा जाहदी ठार झाले आहेत. जाहदी यांनी वर्ष २०१६ पर्यंत लेबनॉन आणि सीरिया यांच्या ‘कुद्स फोर्स’ या दलाचे नेतृत्व केले होते. इराणच्या सरकारी वाहिनीने माहिती दिली की, उद्ध्वस्त झालेल्या वाणिज्य दूतावासामध्येच इराणच्या राजदूतांचे निवासस्थान होते.
सीरियाचे परराष्ट्रमंत्री फैजल मकदाद यांनी इराणचे सीरियातील राजदूत हुसेन अकबरी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले की, ‘या आक्रमणाचे सडेतोड उत्तर दिले जाईल.’ हमास आणि हिजबुल्ला या आतंकवादी संघटनांना इराण साहाय्य करत असल्याने इस्रायलकडून हे आक्रमण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.