याचे सरळ साधे सोपे उत्तर, कदाचित ‘हो’ असे असू शकते; पण तसे करणे शक्य नाही. ते सामान्य माणसालाच नव्हे, तर अनेक तंत्रज्ञ, इंजिनीयर यांनाही सहज पटू शकते. आजच्या जगात चालू असलेली तंत्रज्ञानाची प्रगती आणि ‘हॅकर्स’ची रस्सीखेच पहाता जागतिक दर्जाच्या अधिकोषांच्या प्रणालीमध्ये (‘बँकिंग सिस्टीम’मध्ये) हॅकिंग होऊ शकते. आपल्या संगणकाचे ‘हॅकिंग’ होऊ शकते, तर ‘इ.व्ही.एम्.’मध्येही सहज होऊ शकते, असे वाटणे अतिशय स्वाभाविक सुद्धा आहे; परंतु आपल्याला नीट समजून घेतले पाहिजे की, आपले ‘इ.व्ही.एम्.’ हे एक यंत्र नाही, तर ती एक पूर्ण यंत्रणा आहे आणि म्हणून आपल्याला ‘इ.व्ही.एम्.’ यंत्र अन् ‘इ.व्ही.एम्. मतदान यंत्रणा’ असा २ प्रकारे विचार करावा लागेल.
(टीप : ‘हॅकिंग’ म्हणजे, तर एखाद्या प्रणालीमधील (जसे संगणक, नेटवर्क, स्मार्टफोन) उणिवा शोधून विनाअनुमती चोरून माहिती मिळवणे, यालाच ‘हॅकिंग’ म्हणतात आणि जो व्यक्ती हे करतो, त्याला ‘हॅकर’ म्हटले जाते. हॅकर हा एक असा व्यक्ती असतो, ज्याला संगणकीय किंवा तांत्रिक प्रणाली (प्रोग्राम), त्यातील सुरक्षा यंत्रणा यांविषयी चांगली माहिती असते आणि तिचाच उपयोग तो ‘हॅकिंग’साठी करत असतो.) |
१. ‘इ.व्ही.एम्.’ यंत्र अत्यंत सुरक्षित
अमेरिकेत किंवा परदेशात कुणी ‘इ.व्ही.एम्.’ हॅक करून दाखवले आणि त्यांचे ते यंत्र हॅक होत असेल, तर (‘आपण त्यांच्यापेक्षा अडाणी’ हा समज पूर्ण ठसवला असल्याने) ‘आपली (भारतातील) तर हॅक होणारच’, असा तर्क दिला जातो. यासाठी काही लोक संगणकावर ‘इ.व्ही.एम्.’ची नक्कल (सिम्युलेशन) करून दाखवतात आणि ते ‘हॅक’ करण्याचे प्रात्यक्षिक (डेमो) देतात. संगणकीय नक्कल (कॉम्प्युटर सिम्युलेशन) आणि प्रत्यक्ष यंत्र यांत जमीन अस्मानाची तफावत आहे. प्रगत देशात चाचणी घेतलेले किंवा हॅक करून दाखवलेले यंत्रही आधुनिक संगणकच आहेत आणि त्यातील ‘प्रोग्राम कंट्रोल’ (संगणकीय प्रणालीतील सॉफ्टवेअरला दिलेल्या एक प्रकारच्या सूचना) करणे अन् पालटणे हे सहज शक्य आहे. सर्वांत महत्त्वाचा भेद म्हणजे ही सगळी अत्याधुनिक यंत्रेही बाहेर ‘कनेक्ट’ (संपर्क यंत्रणांना जोडली जाणारी) होऊ शकणारी आहेत. वायर वापरून किंवा ‘वायरलेस कनेक्शन’ (बिनतारी यंत्रणा) करून प्रणालीमध्ये घुसणे, त्यात पालट करणे किंवा ती बंद पाडणे, हे सहज नसले, तरी शक्य नक्कीच आहे.
आपल्या इ.व्ही.एम्.ला ‘वायफाय’ (इंटरनेटची जोडणी), ‘ब्लुटूथ’, ‘४ जी’ किंवा ‘५ जी’ अशी कुठलीही बाह्य संपर्क यंत्रणेची जोडणीच नाही. बाहेरून ते ‘हॅक’ करता येणे, हे अजिबात शक्य नाही. आपल्याला भारताचे ‘मंगळयान’ आठवत असेल, सर्व जगाला अचंबित करणारी गोष्ट आपण अत्यंत उत्तमपणाने, अतिशय अल्प व्ययात साध्य केली होती; कारण त्यात उपलब्ध असलेले सर्वोत्तम नव्हे, तर आवश्यक तेवढेच तंत्रज्ञान वापरले होते आणि हीच गोष्ट आपल्या ‘इ.व्ही.एम्.’ यंत्राचे वैशिष्ट्य आहे. आवश्यक तेवढेच तंत्रज्ञान, आवश्यक तेवढीच संगणकीय प्रणाली आणि आवश्यक तेवढीच ‘केबल कनेक्टिव्हिटी’ (वायरची जोडणी) यामुळे आपले ‘इ.व्ही.एम्.’ यंत्र अतिशय साधे असले, तरी अत्यंत सुरक्षित बनले आहे. आजच्या जगात एकाच वेळी अनेक भ्रमणभाष ‘हॅक’ करणे सहज शक्य आहे; परंतु गणकयंत्र (कॅल्क्युलेटर) ‘हॅक’ करता येईल का ?
२. ‘इ.व्ही.एम्.’ एक मतदान प्रणाली म्हणून बघणे महत्त्वाचे !
वरील सर्व विवेचन योग्य आहेच, तरीही ‘जोपर्यंत इ.व्ही.एम्.मध्ये एक प्रणाली (प्रोग्राम) आहे आणि केबल वापरून का होईना, संपर्क यंत्रणा आहे तोपर्यंत तात्त्विकदृष्ट्या, उत्पादनाच्या ठिकाणी किंवा उत्पादकांकडूनच ‘इ.व्ही.एम्. हॅक’ होऊ शकते’, असे म्हणता येईल. ‘एकाचे मत दुसर्याला जाईल, काही काळ मतमोजणी योग्य दाखवेल; परंतु २ किंवा ४ दिवसांनंतर इकडची मते तिकडे होतील’, असे चुकीचे काही तरी प्रणालीमध्ये (‘प्रोग्रामिंग’मध्ये) प्रारंभीलाच यंत्रामध्ये भरून दिले तर ? ही सर्व यंत्रे आणि त्यांचा ‘प्रोग्राम’ हे एकच आस्थापन बनवत असल्याने या शंकेला बळकटी येते; परंतु ‘इ.व्ही.एम्.’ हे एक यंत्र आहे. त्याला पक्ष आणि उमेदवार यांची नावे अजिबात समजत नाहीत, तर ‘इ.व्ही.एम्.’साठी ती केवळ बटणे असतात. बटण १, बटण २, बटण ३ इत्यादी. आपण ठरवतो बटण १ कुणाचे, २ कुणाचे.
आता समजा प्रारंभीलाच ‘प्रोग्राम’ केला की, बटण १ दाबले, तरी मताची नोंद बटण २ साठी होईल, होईलही कदाचित्; पण बटण १ कुणाचे आणि बटण २ कुणाचे ? हे प्रत्येक मतदारसंघात वेगळे असते. उमेदवाराच्या आद्याक्षराप्रमाणे असते त्याचे काय ? त्यातून ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रे अनेक ठिकाणी सुरक्षितपणे ठेवलेली (स्टोअर) केलेली असतात आणि ती कोणतीही कुठेही सगळीकडे पाठवली जातात. तरीसुद्धा अगदी गृहित धरले की, ‘इ.व्ही.एम्. हॅक’ होऊ शकते, तरी असे ‘हॅकिंग’ प्रत्येक मतदारसंघात जाऊन करावे लागेल. तेथे असलेल्या अक्षरशः सहस्रो यंत्रांना वायर लावून जोडणी करावी लागेल आणि नवीन ‘प्रोग्राम’ त्यात भरावा लागेल. असा ‘प्रोग्राम’ प्रत्येक मतदारसंघासाठी वेगळा आणि तेही तेथील उमेदवार पक्के झाल्यावर, अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर सिद्ध करावा लागेल. प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची संख्या वेगवेगळी असते, क्रम नावाप्रमाणे असतो.
३. ‘इ.व्ही.एम्.’वर शंका घेणे शुद्ध मूर्खपणा नाही का ?
भारतात ५५० मतदारसंघ आणि ७५० जिल्हे आहेत. एका निवडणुकीत भारतात साधारण ३२ लाख ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रे वापरली जातात. ‘हॅक’ करायचे, तर किती माणसे लागतील ? किती परिश्रम लागतील ? आणि अशी सगळीच माणसे गप्प कशी बसतील ? आजपर्यंत एकही अभियंता (इंजिनीयर) असा पुरावा घेऊन वा पालटलेला ‘प्रोग्राम’ घेऊन समोर का आला नाही ? १ टक्का ‘इ.व्ही.एम्.’ जरी कुणी ‘हॅक’ केली, तरी रातोरात सर्व बाहेर येईल, व्हिडिओ फिरतील आणि न्यायालयात सिद्ध होईल. आजही या यंत्रणेमधील अनेक बाबू (अधिकारी) हे नेहरू-गांधी घराण्याला प्रामाणिक आहेत. हे खरोखर शक्य असते, तर आजपर्यंत काँग्रेसनेच काही आतील गटातील तंत्रज्ञ विकत घेऊन स्वतः ‘इ.व्ही.एम्. हॅक’ केली असती आणि जाहीरपणे हे सिद्ध करून दाखवले असते.
सॅम पित्रोदासुद्धा हे करू शकत नसतील, तर ‘इ.व्ही.एम्.’वर शंका घेणे, हा शुद्ध मूर्खपणा नाही का ? (राजीव गांधींनी कुणाला हाताला धरून संगणकीय क्रांती केली होती ? हाही प्रश्न निर्माण होतो.)
तरीसुद्धा काही जणांच्या मनात असलेली पुसटशी शंकासुद्धा दूर करण्याचे काम ‘व्हीव्हीपॅट’ने केले आहे. (‘व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट)’ हे भारतीय सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान यंत्राच्या शेजारी ठेवण्यात येत असलेले एक यंत्र आहे. मतदान केल्यानंतर मत कुणाला केले आहे ? हे दाखवणारी चिठ्ठी त्या यंत्रातून बाहेर येते आणि ७ सेकंदात परत जाते.) आता बहुतेक सर्व मतदारसंघात ‘व्हीव्हीपॅट’ वापरली जातात आणि आजपर्यंत असे एकसुद्धा उदाहरण नाही की, ‘व्हीव्हीपॅट’चे मतदान आणि यंत्रावर केलेले मतदान यांच्यामध्ये तफावत आढळली आहे, म्हणजेच आपले ‘इ.व्ही.एम्.’ हे ‘एक साधे किमान आवश्यक तंत्रज्ञान आणि ‘प्रोग्राम’ यांवर आधारित अतिशय सुरक्षित यंत्र आहे.’ असे असूनही जरी आपण गृहीत धरले की, यंत्र ‘हॅक’ होऊ शकते, तरी आपली संपूर्ण यंत्रणा ही इतकी गुंतागुंतीची आहे की, प्रत्यक्षात ती ‘हॅक’ करणे, हे केवळ अशक्य आहे. ‘व्हीव्हीपॅट’ने वेळोवेळी आणि प्रत्येक वेळी हे सिद्ध करून दाखवले आहे.
४. मग सगळे विरोधी पक्ष प्रतिदिन ओरडत का असतात ?
काँग्रेस, समाजवादी, ममता बॅनर्जी, साम्यवादी यांच्या पद्धतीत मतपत्रिका ‘हॅक’ करणे, ही सर्वांत सोपी गोष्ट आहे. त्याचे अनेक प्रकार आहेत आणि तेच करून ते इतके दिवस जिंकत होते. त्यांच्या दुर्दैवाने आणि देशाच्या सुदैवाने सरकारच्या कामांमुळे भारतीय जनमानस इतके भारावलेले आहे की, परत ‘मतपत्रिका’ (बॅलेट पेपर) वापरून ‘व्होटिंग हॅक’ (मतदानाची चोरी) केल्याविना निवडणुका जिंकणे, हे विरोधकांना अशक्य आहे.
भारताची ‘इ.व्ही.एम्.’ यंत्राद्वारे मतदानाची प्रक्रिया ही संपूर्ण सुरक्षित आहे, याची पूर्ण खात्री बाळगा आणि पूर्ण बहुमताचे सरकार अन् सामर्थ्यशाली भारत यांसाठी १०० टक्के मतदान करा.
– विजय पुरंदरे (साभार : फेसबुक)