भंडारा येथे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची जुमदेव महाराजांच्या सेवकांची मागणी !

पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी जुमदेव महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज

भंडारा – मानवधर्माची शिकवण देणारे बाबा जुमदेव महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करून बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी बाबा जुमदेव महाराज यांच्या सेवकांनी केली आहे. सेवकांनी मोहाडीसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत बागेश्वर महाराजांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट (दाखल) केल्या आहेत. बागेश्वर महाराजांच्या विधानानंतर मोहाडी येथे ठिकठिकाणी बागेश्वर महाराजांचे फलक आणि भित्तीपत्रके फाडण्यात आले आहेत.

१. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे ३० मार्चच्या सायंकाळी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

२. बागेश्वर महाराजांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे बाबा जुमदेव महाराज यांना मानणार्‍या सहस्रो सेवकांच्या भावना दुखावल्या आहेत. ‘बागेश्वर महाराजांविरुद्ध गुन्हे नोंद करून त्यांना दुपारी ४ वाजेपर्यंत अटक करावी आणि चालू असलेला त्यांचा कार्यक्रम बंद करावा अन्यथा बाबा जुमदेव महाराजांचे सेवक कायदा हातात घेऊन बागेश्वर महाराजांना अद्दल घडवतील आणि याला प्रशासन उत्तरदायी राहील’, अशी चेतावणी भंडारा येथील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे.

पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी केलेले वक्तव्य

भागवत सप्ताहात बागेश्वर महाराज म्हणाले, ‘‘नागपूर आणि भंडारा येथे एका विशेष संप्रदायाला मानणारा वर्ग आहे. ते हनुमानजींना तर मानतात; मात्र हनुमानजींची पूजा करणे मानत नाही. श्राद्ध करायचे नाही. माता-पित्यांची छायाचित्रे ठेवायची नाहीत. ‘राम राम’ बोलायचे नाही. ‘जय गुरुदेव’ बोला. जो हनुमान संपूर्ण जीवनभर ‘राम राम’ म्हणत होता, त्यांचे उपासक ‘राम राम’ बोलणार नाहीत. हद्द झाली यार….रसगुल्ला खात आहेत…मात्र शुगर असल्याचे सांगत आहेत. असे करणार्‍या लोकांनी कान उघडून ऐकावे की, तुमचे पूर्वज् नरकात गेले आहेत. तुमची येणारी पिढीही नरकात जाईल. अशी भक्ती हनुमानजींना कधीच प्रिय नाही.’’