केलेल्या विकासकामांच्या जोरावर माझा विजय निश्चित ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना

भाजप कार्यालयात बोलतांना खासदार संजय मंडलिक (उभरलेले), तसेच अन्य मान्यवर

कोल्हापूर, २९ मार्च (वार्ता.) – केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या ७०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या जोरावर, तसेच देशातील जनतेला पंतप्रधान मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करावयाचे असल्याने माझा विजय निश्चित आहे. गत वेळेस परिस्थिती वेगळी असल्याने अनेकांची कामे झाली नाहीत, त्याविषयी मी क्षमा मागतो. यंदा मात्र असे होणार नाही.

पंचगंगा नदी प्रदूषण दूर करणे, श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्याला गती देणे यांसह कोल्हापूरच्या विकासाची अनेक महत्त्वाची कामे यापुढील काळात केली जातील, असे प्रतिपादन कोल्हापूर मतदारसंघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले. संजय मंडलिक यांची उमेदवारी घोषित झाल्यावर त्यांनी भाजप कार्यालयात भेट दिल्यावर ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सौजन्य : ZEE २४ तास

याप्रसंगी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, ‘‘गतवेळेस संजय मंडलिक हे निवडून आल्यावर भाजप कार्यकर्त्यांची कामे झाली नाहीत. मतदान करायला आम्ही आणि कामे मात्र काँग्रेसवाल्याची होणार, यापुढे असे चालणार नाही. भाजप कार्यकर्त्यांनी दूरभाष केल्यावर ते उचलेले गेले नाहीत. खासदार संजय मंडलिक आणि भाजप यांची एक समन्वय समिती नेमून काम झाले पाहिजे.’’

संग्रहित छायाचित्र

यंदा काँग्रेसचा एकही खासदार निवडून येणार नाही ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

या प्रसंगी भाजप खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘भाजपने गेल्या १० वर्षांत अनेक विकासकामे केली असून विरोधकांवर टीका करण्यात आपण वेळ वाया घालवता कामा नये. भाजपने केलेली कामे आणि योजना सामान्य मतदारापर्यंत पोचवा. आपल्याला यंदा ‘अबकी बार ४०० पार’ हे साध्य करायचे आहे.

राहुल गांधीची ‘जोडो-भारत’ यात्रा ज्या ज्या राज्यातून जात आहे, तेथील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्या वेळेस काँग्रेसचे २ खासदार निवडून आले, यंदा एकही खासदार निवडून येणार नाही, अशी स्थिती आहे.’’