सातारा, २५ मार्च (वार्ता.) – येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने गत आठवड्यात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या वेळी दीड लाख रुपयांचे सायलेन्सर आणि हॉर्न शासनाधिन करण्यात आले होते. या साहित्यावर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने बुलडोझर फिरवला आहे.
गत काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी प्रेशर हार्न, पोलीस सायरन, बुलेट प्रकारातील दुचाकीला कर्कश सायलेन्सर लावून युवक शहरातील मुख्य रस्त्यावरून ये-जा करत होते. याचा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत होता. याविषयी नागरिकांनी वाहतूक नियंत्रण शाखेकडे लेखी आणि तोंडी तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या. याची गंभीर नोंद घेत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांनी विशेष पथकाची निर्मिती केली. या पथकाच्या माध्यमातून शहरातील विविध चौकांत विशेष मोहीम राबवण्यात आली. या वेळी वाहतूक पोलिसांनी ५६ पालट केलेले सायलेन्सर, २० हॉर्न, १० पोलीस सायरन, ५ हून अधिक प्रेशर हॉर्न शासनाधिन केले, तसेच वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत सायलेन्सर आणि हॉर्न नष्ट केले.