मुसलमानांनी मुलांना शिकण्यासाठी मदरशांऐवजी शाळेत पाठवावे !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे आवाहन !

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा

गुवाहाटी (आसाम) – आसाममधील मियांना (बंगाली भाषिक मुसलमानांना) मान्यता हवी असेल, तर त्यांना बालविवाह आणि बहुपत्नीत्व यांसारख्या प्रथा सोडून द्याव्या लागतील. या लोकांना त्यांच्या मुलांना आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंता (इंजिनिअर) बनावायचे असेल, तर त्यांना मदरशांऐवजी शाळेत पाठवावे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. ‘दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घालता येणार नाहीत आणि अल्पवयीन मुलींचे लग्नही करता येणार नाही’, अशीही अट मुख्यमंत्री सरमा यांनी मुसलमानांना घातली आहे. ‘मिया’ हा आसाममधील बंगाली भाषिक मुसलमानांसाठी वापरला जाणारा शब्द आहे. बिगर बंगाली भाषिक लोक त्यांना बांगलादेशी स्थलांतरित म्हणून ओळखतात.

१. मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, आसामी लोकांची संस्कृती आहे, जिच्यामध्ये मुलींची तुलना शक्तीशी (देवी) केली जाते आणि २-३ वेळा लग्न करणे, ही आसामी संस्कृती नाही. जर बंगाली भाषिक मुसलमान आसामी परंपरांचे पालन करू शकत असतील, तर तेदेखील स्वदेशी मानले जातील.

२. आसाम सरकारच्या मंत्रीमंडळाने वर्ष २०२२ मध्ये अनुमाने ४० लाख आसामी भाषिक मुसलमानांना स्थानिक आसामी मुसलमान म्हणून मान्यता दिली आणि त्यांना बांगलादेश वंशाच्या स्थलांतरितांपेक्षा वेगळे केले. आसामी भाषिक स्थानिक मुसलमान एकूण मुसलमान लोकसंख्येपैकी ३७ टक्के आहेत. उर्वरित ६३ टक्के स्थलांतरित बंगाली भाषिक मुसलमान आहेत.