पूर्वी सराईत गुंड असणारा मुलगा करू लागला धार्मिक कार्य !
उज्जैन (मध्यप्रदेश) – श्रवणकुमार सारख्या पुत्रांच्या कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या आणि वाचल्या असतील. भगवान श्रीरामांच्या अनेक भक्तांविषयीही तुम्ही ऐकले असेल, जे अनेक समस्यांना तोंड देत अयोध्येत भगवंताचे दर्शन घेण्यासाठी आले होते. उज्जैन येथे अशाच एका श्रवणासारख्या पुत्राने स्वतःच्या आईवरचे प्रेम दाखवून दिले आहे. या मुलाने स्वतःच्या शरिराची कातडी काढून त्याद्वारे आईसाठी चरण पादुका बनवल्या आहेत. रौनक गुर्जर असे या मुलाचे नाव आहे.
रौनक गुर्जर पूर्वी एक सराईत गुंड होता. त्याच्या नावावर अनेक गुन्हे नोंद होते. पोलिसांच्या चकमकीत त्याच्या पायाला गोळीही लागली होती. कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्यामध्ये पालट झाला. तो सामाजिक कार्यासमवेत धार्मिक कार्येही करू लागला. त्याने येथे भागवत कथेचे आयोजन केले होते. त्या वेळी त्याने कथावाचक जितेंद्र महाराज यांना सांगितले की, त्यांनी आईसाठी स्वतःच्या कातडीपासून चरण पादुका बनवल्या आहेत.
महाराजांनी त्यांच्या कथेमध्ये रौनक यांच्या कृतीची माहिती दिली, तेव्हा सर्व जण अवाक् झाले. या कृतीविषयी रौनक गुर्जर यांनी सांगितले की, त्यांना रामायणातून असे करण्याची प्रेरणा मिळाली.