सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात १९ अध्यासनांपैकी १२ अध्यासनांना प्रमुख नसल्याची माहिती उघड !


पुणे
– लोकाभिमुख विद्यापिठासाठी अध्यासने ही उत्प्रेरक म्हणून कार्य करतात; मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील १९ अध्यासनांपैकी १२ अध्यासनांना प्रमुखच नसल्याची माहिती समोर आली आहे.

निधीअभावी बिरसा मुंडा यांच्या नावाचे अध्यासनही रखडले आहे. अधिसभेच्या पार्श्वभूमीवर सदस्य अधिवक्ता ईशानी जोशी यांनी विद्यापीठ प्रशासनाला प्रश्न विचारला होता. त्यात १९ अध्यासनांपैकी ७ अध्यासनांना प्रमुख असून इतर अध्यासनाच्या प्रमुखांची नियुक्ती प्रक्रिया चालू असल्याचे म्हटले होते, तर २ कोटी रुपयांचा स्थायी निधी अथवा देणगी प्राप्त झाल्यानंतर ‘बिरसा मुंडा अध्यासन’ निर्माण केले जाणार आहे, असे स्पष्ट केले होते; मात्र निधीअभावी या अध्यासनाची स्थापना रखडल्याचे समोर आले आहे.

‘अधिसभा सदस्यांना विश्वासात घेतले असते, तर आजपर्यंत निधी उभा राहिला असता. या ढिसाळ कारभाराविषयी प्रशासनाला, तसेच अधिसभेत जाब विचारू’, असे अधिसभा सदस्य गणपत नांगरे यांनी सांगितले. महापुरुष आणि विचारवंत यांच्या नावाने चालू झालेली अध्यासने, ही एक प्रकारची विचारपिठे आहेत; मात्र अध्यासनांची पदे रिक्त ठेवून ही विचारपिठे खुंटवण्याचे काम होत आहे, असे मत काही अधिसभा सदस्यांनी व्यक्त केले.

संपादकीय भूमिका

शिक्षणाच्या संदर्भात अशी उदासीनता असणे गंभीर आहे !