श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंड आणि अन्य कामे यांसाठी २१ कोटी ६८ लाख रुपये व्ययासाठी राज्यशासनाची मान्यता !

श्री महालक्ष्मीदेवी

कोल्हापूर – श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंड, गरुड मंडप आणि नगारखाना इमारत यांच्या दुरुस्तीसाठी २१ कोटी ६८ लाख रुपये व्यय करण्यास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला राज्यशासनाच्या विधी अन् न्याय विभागाने मान्यता दिली आहे. यात मनकर्णिका कुंड कामासाठी ५ कोटी ४० लाख ९९ सहस्र ९३४ रुपये, गरुड मंडप दुरुस्तीसाठी १२ कोटी ८५ लाख ९२ सहस्र ८७ रुपये, तर नगारखाना इमारत दुरुस्तीसाठी ३ कोटी ४१ लाख ३४ सहस्र ७७३ रुपये व्यय केले जाणार आहेत.

या संदर्भातील अंदाजपत्रक आणि आराखडा प्रारंभी साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यांनी या विषयाची तांत्रिक पडताळणी केल्यावर याला मान्यता दिली. यानंतर या कामाला राज्यशासनाच्या विधी आणि न्याय विभागाने मान्यता दिली. येत्या दीड वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. या संदर्भात राज्य पुरातत्व विभाग उपसंचालक विलास वाहणे म्हणाले, ‘‘सर्व गोष्टींचे पालन करून अत्यंत काटेकोर पद्धतीने आणि निश्चित केलेल्या कालावधीत हे काम होणार आहे. श्री महालक्ष्मीदेवी मंदिराला धार्मिक, पुरातन महत्त्व आहे. त्याला कुठेही बाधा होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी लागणार आहे.’’