पिंपरी (पुणे) महापालिकेचे कामकाज होईल ‘पेपरलेस’ !

  • सध्या ९ विभाग चालू
  • उर्वरित विभाग लवकरच ‘ऑनलाईन’

पिंपरी (पुणे) – महापालिकेचा कारभार आता कागदविरहित (पेपर लेस) होण्याच्या दृष्टीने ‘जी.एस्.आय. सक्षम ई.आर्.पी.’ प्रणालीचे अनावरण आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. आतापर्यंत ९ विभागांचे कामकाज ‘ऑनलाईन’ केले आहे. उर्वरित ३५ विभागांचेही कामकाज लवकरच ‘ऑनलाईन’ करण्यात येईल. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांचे श्रम वाचून कामकाजामध्ये पारदर्शता येईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील ‘जी.एस्.आय. सक्षम ई.आर्.पी.’नुसार, नागरी सुविधा, भांडार विभाग, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, सर्व नाट्यगृहांचे आरक्षण, ग्रंथालये, पशूवैद्यकीय विभागातील श्वान प्रमाणपत्रे, माहिती अधिकार अर्ज आदी विभागांचे कागदविरहित ‘ऑनलाईन’ कामकाज करण्यात येत आहे. कामकाज ‘ऑनलाईन’ केल्याने अधिक सुलभता येईल. त्यामुळे कागदविरहित सर्व धारिकांनाही अनुमती देता येणार आहे.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘‘महापालिकेच्या सर्व विभागांच्या अंतर्गत प्रशासन कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करणे, नागरिकांना ‘ऑनलाईन’ सेवा सुलभ होण्याच्या दृष्टीने ‘जी.एस्.आय. सक्षम ई.आर्.पी.’ प्रणाली चालू केली आहे. यामुळे अधिकारी, कर्मचारी यांना निर्णय घेणे सहज सुलभ होणार आहे. यामुळे कामकाजाला गती मिळेल.’’