मुंबई – आम्ही कुठलाही पक्ष फोडला नाही. पुत्र आणि कन्या यांच्या मोहामुळे शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले, हेच वास्तव आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
या वेळी अमित शहा म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांची इच्छा होती की, आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत. त्यामुळेच त्यांच्या पक्षातील एक मोठा गट पक्षापासून विभक्त झाला. शिवसेनेतील अन्य नेत्यांना आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व मान्य नव्हते. शरद पवारही त्यांच्या मुलीला पक्षाच्या नेत्या करू इच्छित होते. त्यांच्या पक्षातील अनेक वरिष्ठ नेते याच्याशी सहमत नव्हते. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. जागावाटपाविषयी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही.’’