कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक माहिती देणे टाळा !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

प्रतिकात्मक छायाचित्रं

‘एका राज्यातील एका शहरामध्ये एका साधिकेच्या घरी घरगुती गॅसच्या पाईपचे काम करण्यासाठी एक व्यक्ती आली होती. त्या व्यक्तीने तिचे काम करत असतांना साधिकेशी हुशारीने संवाद साधत तिला अनेक प्रश्न विचारले आणि त्याद्वारे संबंधित साधिकेची तपशीलवार माहिती घेतली. ‘साधिकेचे सासर कुठे आहे ? सासू-सासरे कुठे असतात ? पती कुठे असतात ? ते काय करतात ? माहेर कुठे आहे ? माहेरी कोण असते ?’ इत्यादी माहिती त्या व्यक्तीने जाणून घेतली. त्या वेळी बोलण्याच्या ओघात साधिकेनेही तिची वैयक्तिक माहिती या अनोळखी व्यक्तीस मोकळेपणाने सांगितली. या प्रसंगात त्या साधिकेने संभाव्य परिणामांचे गांभीर्य लक्षात घेऊन सतर्कता बाळगली नाही.

वरील प्रसंगाचे गांभीर्य जाणून साधकांनी स्वतःची वैयक्तिक माहिती कोणत्याही व्यक्तीला देण्यापूर्वी पुढील सूत्रांविषयी अत्यंत सतर्कता बाळगावी.

१. कोणत्याही कारणामुळे आपल्या संपर्कात आलेल्या अनोळखी व्यक्तीला कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नये.

२. आपण दिलेल्या वैयक्तिक माहितीचा अयोग्य वापर झाल्यास आपल्यासह कुटुंबियांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अलीकडच्या काळात समाजात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

३. काही साधकांचे कुटुंबीय अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी बाहेर जातात किंवा काही साधकांचे कुटुंबीय सनातनच्या सेवाकेंद्रात सेवा करण्यासाठी जातात. काही साधिका घरी राहून सेवा करतात. त्यामुळे अशा प्रकारची माहिती दिल्याने अनोळखी व्यक्तीकडून आपल्या धन-संपत्तीलाही हानी पोचू शकते.

‘कुणासही आपली वैयक्तिक माहिती देऊन आपणच आपल्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहोत’, याची जाणीव ठेवावी. कुणीही काही वैयक्तिक विचारणा केल्यास त्याचे परिणाम ओळखावेत आणि सतर्क राहून माहिती देणे टाळावे.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (६.३.२०२४)