मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्‍या विहिरीची पूजा करण्यापासून थांबवून दाखवा !

  • श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने दिले आव्हान !

  • १ आणि २ एप्रिल या दिवशी करण्यात येणार पूजा !

आशुतोष पांडेय

मथुरा (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आशुतोष पांडेय यांनी सामाजिक माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित करून जिल्हा प्रशासन आणि ईदगाह मशीद समिती यांना चेतावणी दिली आहे. पांडेय यांनी म्हटले आहे की, १ आणि २ एप्रिल या सप्तमी आणि अष्टमी असणार्‍या दिवशी मशिदीच्या आवारात बांधलेल्या कृष्ण विहिरीची पूजा करण्यासाठी हिंदू येणार आहेत. कुणात धाडस असेल, तर त्यांना थांबवून दाखवा. आम्ही तेथे पूजा करूच. पूजा करणे हा आमचा अधिकार आहे. ५ मार्चला आम्ही  जिल्हाधिकार्‍यांकडे अनुमती मागितली आहे; मात्र अद्याप आम्हाला यावर काहीही कळवण्यात आलेले नसले, तरी आम्ही थांबणार नाही.

सध्या श्रीकृष्णजन्मभूमी मंदिर आणि शाही ईदगाह मशीद यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दल आणि पोलीस हे तैनात आहेत. दोन्ही आवारात येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीची सखोल तपासणी केली जाते. दोन्ही आवारात भ्रमणभाष संचावर बंदी आहे. ट्रस्टने पांडेय यांचा हा व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने दक्षता वाढवली आहे.