महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील मंदिरांत कोट्यवधी भक्तांची गर्दी !

काशी विश्‍वनाथ, सोमनाथ यांसह १२ ज्योतिर्लिंगांमध्ये भावपूर्ण रूपाने हिंदूंनी घेतले आपल्या आराध्याचे दर्शन !

नवी देहली : महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शिवमंदिरे सजली होती. भगवान शंकराच्या दर्शनासाठी ७ मार्चच्या मध्यरात्रीपासून शिवभक्तांनी अनेक मंदिरांमध्ये पुष्कळ गर्दी केली. वाराणसी येथील काशी विश्‍वनाथ, गुजरातमधील सोमनाथ यांसह देशभरातील सर्व ज्योतिर्लिंगामध्ये कोट्यवधी हिंदूंनी आपल्या आराध्याचे भावपूर्ण दर्शन घेतले. महाराष्ट्रातही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्‍वर, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर मंदिरासह हिंगोली येथील औंढा नागनाथ मंदिरातही दर्शनासाठी भाविकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.

आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे झाली शासकीय महापूजा !

भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्चच्या रात्री १२ वाजता शासकीय महापूजा पार पडली. देशभरातून भाविक मोठ्या संख्येने भीमाशंकर येथे आले आहेत. ‘हर हर महादेव, ‘बम बम भोले’ यांचा गजर करत अनेक भाविक-भक्त यांनी महादेवाचे दर्शन घेतले. आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये शिवलिंगाला आंब्यांची आरास करण्यात आली आहे. औंढा नागनाथ मंदिरामध्ये भूगर्भात असलेल्या शिवलिंगाची सजावट करण्यात आली होती. शिवलिंगाला फुलांची सजावट करत या वर्षीच्या नवीन आंब्यांची आरासही करण्यात आली आहे. त्यामुळे शिवलिंगाचे सौंदर्य अधिक वाढले आहे.

जेजुरी येथील गुप्तलिंगांचे भाविकांनी घेतले भावपूर्ण दर्शन !

जेजुरी येथील मंदिरात असणारी ३ गुप्तलिंगे वर्षातून केवळ एकदाच महाशिवरात्रीला दर्शनासाठी खुली केली जातात. सकाळपासून गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. खंडेराया मंदिराच्या गाभार्‍यात आणि शिखरामध्ये गुप्तलिंग आहे. भूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक अशा तिन्ही लोकांचे एकाच दिवशी महाशिवरात्रीला दर्शन होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.