पुणे येथील सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांना तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असतांनाही त्यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा ढळली नाही. त्या साधकांना सहज आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करून साधकांचीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा दृढ करतात. पू. (सौ.) मनीषा पाठक यांची पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे. ७.३.२०२४ या दिवशी यातील काही सूत्रे आपण पाहिली. आज पुढील भाग पाहू.
भाग ३ बघण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/771236.html
(भाग ४)
१५. श्री. श्रीकांत बोराटे, भोर, जिल्हा पुणे.
१५ अ. पू. (सौ.) मनीषाताईंनी सांगितल्याप्रमाणे स्वयंसूचना सत्रे केल्याने भ्रमणभाषचा अनावश्यक वापर करण्याचे प्रमाण उणावणे आणि साधनेची घडी बसून आनंद मिळणे : ‘माझ्यातील स्वभावदोषांमुळे माझ्याकडून भ्रमणभाषचा अनावश्यक वापर होत असे. मी रात्री जेवण झाल्यावर किंवा झोपायच्या आधी यू-ट्यूबवर अनावश्यक चलचित्रे (व्हिडिओ) पहात असे. त्यामुळे माझ्यावर वाईट शक्तीचे आवरण येऊन मला सकाळी लवकर उठायला कठीण होत होते. त्यामुळे माझे सकाळी व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या आढावा सत्संगात सहभागी होणे अनियमित होत होते. माझ्या साधनेची हानी होत होती. माझ्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी व्यवस्थित बसत नव्हती. पू. मनीषाताईंनी मला यावर स्वयंसूचना द्यायला सांगितली आणि मला या चुकीची जाणीव करून दिली. स्वयंसूचना देऊन कृतीच्या स्तरावर प्रयत्न केल्याने माझे भ्रमणभाषचा अनावश्यक वापर करण्याचे आणि चलचित्रे पहाण्याचे प्रमाण उणावले. त्या वेळात मी ‘स्वतःवरील वाईट शक्तीचे आवरण काढणे, स्वयंसूचना सत्रे करणे, नामजप करणे’, असे प्रयत्न करू लागलो. त्यामुळे माझ्यावरील आवरण न्यून होण्यास साहाय्य झाले. मला सकाळी लवकर उठता येऊ लागले. मला होत असलेले ‘शरीर जड होणे आणि दुखणे’, हे त्रास न्यून झाले. माझ्या साधनेची घडी बसून मला आनंदी रहाता येऊ लागले.
१५ आ. पू. मनीषाताईंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न केल्याने कौटुंबिक आणि सेवेतील प्रसंग यांचा ताण येण्याचे प्रमाण न्यून होऊन स्थिर अन् सकारात्मक रहाता येणे : कौटुंबिक आणि सेवेतील काही प्रसंग यांमुळे माझ्या मनावर ताण येत असे. माझ्या मनात प्रसंगांविषयी विचार राहिल्याने माझ्या मनाची ऊर्जा व्यय होत असे. याविषयी मी पू. मनीषाताईंना सांगितल्यावर त्यांनी मला ‘प.पू. गुरुदेवांवरील श्रद्धा वाढवणे, त्यांना शरण जाणे आणि आत्मनिवेदन करणे’, असे प्रयत्न करायला सांगितले. पू. ताईंशी बोलल्यावर मला हलकेपणा जाणवला. त्यांनी सांगितल्यानुसार प्रयत्न केल्याने प्रसंगात न अडकता मला सत्मध्ये रहाता आले आणि सेवेतून आनंद घेता आला. मला होत असलेले ‘ताण येणे आणि ताणामुळे डोके दुखणे’, हे त्रास न्यून झाले. मला शांत, स्थिर आणि सकारात्मक रहाता येऊ लागले. माझा उत्साह वाढला आणि मला आनंदी रहाता आले.
१६. श्रीमती मीनाक्षी यशवंत पांडे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७० वर्षे), चिंचवड, पुणे.
१६ अ. सेवेची तळमळ : ‘वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पू. ताई गुरुपौर्णिमेचे सभागृह आणि सेवेचे नियोजन पहाण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी पाऊस जोरात पडत होता. ‘सेवेत उणीव रहायला नको’, म्हणून पू. ताई स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता भर पावसात तळमळीने सेवा करत होत्या. त्यानंतर रात्री त्या तळेगाव येथे सभागृह पहायला गेल्या.
१६ आ. इतरांचा विचार करणे : पू. ताईंचा डाव्या पायाचा गुडघ्याखालील भाग अशक्त झाला आहे. त्यामुळे त्यांना चालतांना त्रास होतो. पू. ताईंना सत्संग घेण्यासाठी चिंचवड येथे यायचे असतांना त्या म्हणतात, ‘‘सत्संगाच्या ठिकाणी जायला उद्वाहक (लिफ्ट) नसला, तरीही काही अडचण नाही. मी जिन्यावरून वर सरकत येऊ शकते.’’ पू. ताई स्वतःचा विचार करण्यापेक्षा इतरांचा अधिक विचार करतात.’
सकाळी उठल्यावर ‘गुरुदेव आहेत, गुरुदेव आहेत’, असे म्हणत राहिल्याने कर्तेपणा दूर होऊन भावावस्थेत रहाता येते !‘पू. ताई साधनेचा आढावा घेतांना सतत म्हणतात, ‘‘सकाळी उठलो की, आपण ‘गुरुदेव आहेत, गुरुदेव आहेत’, असे म्हणत राहूया. त्यामुळे आपल्या मनाला उभारी मिळून आपला कर्तेपणा दूर होतो आणि सकारात्मकता वाढून मनावरचा ताण न्यून होतो. असे केल्याने ‘आयत्या वेळी आलेल्या सेवांचे नियोजनही गुरुदेव करून घेणार आहेत’, हा भाव वाढीस लागतो. आपल्या प्रार्थना, कृतज्ञता आणि शरणागती वाढायला साहाय्य होते.’’ – (पू.) मनीषा महेश पाठक |
१७. सौ. विजया जगताप, चिंचवड, पुणे.
१७ अ. निर्मळ आणि प्रेमळ : ‘पू. मनीषाताईंचे मन निर्मळ आहे. त्या ‘आपण सर्व जण गुरूंचे दास आणि सेवक आहोत’, असे म्हणून सर्वांना आपलेसे करतात. त्यांना कधीही भ्रमणभाष केला, तरीही त्या प्रथम कुटुंबातील सर्वांविषयी विचारतात.
१७ आ. पू. मनीषाताई, म्हणजे प्रेमभाव, भाव आणि भक्ती यांचा अथांग सागरच आहे.
१७ इ. त्यांच्या मधुर वाणीतील शब्द मधाप्रमाणे गोड असून ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.
१७ ई. पू. ताई घेत असलेल्या भावजागृतीच्या प्रयोगांमुळे माझी व्यष्टी साधना भावपूर्ण होऊन मला त्यातून आनंद घेता येत आहे.
१८. सौ. सारिका सचिन मुदकुडे, सिंहगड रस्ता, पुणे.
१८ अ. साधिकेच्या आईच्या आजारपण आणि निधन यांप्रसंगी मार्गदर्शन करून साधिकेला आधार देणे : ‘वर्ष २०१० मध्ये माझ्या आईला कर्करोग झाला. हा प्रसंग मला स्वीकारता येत नव्हता. त्या वेळी पू. मनीषाताई सिंहगड रस्ता येथे अध्यात्मप्रसाराची सेवा करत होत्या. त्यांनी मला पुष्कळ आधार दिला. त्यांनी मला आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन केले. वर्ष २०१२ मध्ये माझ्या आईचे निधन झाले. तेव्हा मला ते सहजतेने स्वीकारता आले.
१८ आ. पू. मनीषाताईंच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१८ आ १. पू. मनीषाताईंनी सत्संगात ‘गुरुदेवांच्या खोलीत जाऊन आत्मनिवेदन करणे’, हा भावजागृतीचा प्रयोग घेतल्यावर साधिकेचे शारीरिक त्रास न्यून होणे : ‘कोरोना महामारीच्या कालावधीत दळणवळण बंदी लागू करण्यात आली होती. तेव्हा पू. मनीषाताईंनी पुणे जिल्ह्यातील साधकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग चालू केला. एकदा मी रुग्णाईत असल्याने झोपूनच सत्संग ऐकत होते. मला उठता येत नव्हते. पू. मनीषाताईंनी सत्संगात ‘गुरुदेवांच्या खोलीत जाऊन आत्मनिवेदन करणे’, हा भावजागृतीचा प्रयोग घेतला. नंतर माझे शारीरिक त्रास न्यून झाले आणि मी उठू शकले. (क्रमशः)
(सर्व सूत्रांचा दिनांक : १८.३.२०२३)
|