France Women Right To Abortion : फ्रान्समध्ये महिलांनी गर्भपात करण्याला राज्यघटनेची स्वीकृती !

असा अधिकार बहाल करणारा फ्रान्स हा जगातील पहिला आणि एकमेव देश !

पॅरिस (फ्रान्स) – जगभरात महिलांनी गर्भपात करण्याच्या कृत्याला गुन्हा मानले जाते. असे असतांना तो महिलांचा घटनात्मक अधिकार असल्याचे विधेयक फ्रान्सच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात ४ मार्च या दिवशी संमत करण्यात आले. यामुळे फ्रान्स आता जगभरातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे, जेथे गर्भपात करण्याचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य महिलांना असेल. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या संदर्भातील प्रस्ताव मांडला होता.

सौजन्य The Times and The Sunday Times

फ्रान्समधील ‘पॅलेस ऑफ व्हर्सेलीस’मध्ये या प्रस्तावावरील मतदानासाठी दोन्ही सभागृहांतील सदस्य पूर्ण संख्येने उपस्थित होते. प्रस्ताव ७८० विरुद्ध ७२ अशा फरकाने संमत करण्यात आले. अमेरिकेतही अशाच प्रकारच्या विधेयकावरून मोठे मतभेद आहेत. त्यामुळे पुरोगामी फ्रान्सच्या या निर्णयाला महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

फ्रान्सच्या राज्यघटनेत सुधारणा !

१. महिलांना गर्भपाताचा अधिकार बहाल करण्यासाठी फ्रान्सच्या राज्यघटनेच्या कलम ३४ मध्ये सुधारणा करणारे विधेयक मांडण्यात आले होते.

२. ‘नॅशनल असेम्ब्ली’ आणि ‘सिनेट’ या फ्रान्सच्या संसदेतील दोन्ही सभागृहांनी स्वतंत्रपणेही हे सुधारणा विधेयक बहुमताने पारित केले होते.

३. या विधेयकावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीमध्ये तीन पंचमांश इतक्या बहुमताची आवश्यकता होती. त्यानुसार संयुक्त अधिवेशनात हे विधेयक संमत करण्यात आले.

संपादकीय भूमिका 

  • स्वैराचाराला प्रोत्साहन देणार्‍या या घटनात्मक अधिकारामुळे उद्या फ्रान्सची अधोगती व्हायला लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • पुरो(अधो)गामीपणाचा ध्वज पुढे नेणार्‍या फ्रान्सचा अनुनय करायला आता भारतासह अन्य देशातील पुरोगामी जमात मागे-पुढे पहाणार नाही; परंतु जिहादी आतंकवादाला पायबंद करणार्‍या याच फ्रान्सच्या कठोर धोरणांना मात्र हीच जमात विरोध करते. यातून त्यांची सोयीस्कर पुरोगामी वृत्ती लक्षात येते !