मुंबई, १ मार्च (वार्ता.) – शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी केलेली वक्तव्ये, तसेच दैनिक ‘सामना’ वृत्तपत्रातील अग्रलेखात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक लिखाणाप्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत १ मार्च या दिवशी हक्कभंग प्रस्ताव प्रविष्ट करण्यात आला आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडला. तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी विधानसभेच्या विशेषाधिकार भंग समितीकडे पाठवला आहे.
आमदार राम कदम म्हणाले की,
१. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाला आधीच ‘चोरमंडळ’ म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांविषयी अवमानकारक शब्द उच्चारले. ‘विधानसभा अध्यक्ष हे निवडणूक आयोगाचे ‘डोमकावळे’ आहेत’, असेही म्हटले होते. यासह अनेक शिव्याशाप देण्यात आले.
२. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरे यांना हे शोभते का ? दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात ‘लोकशाहीची हत्या, काळा दिवस, देहली येथून लिहून आलेली संहिता’, असे शब्दप्रयोग करण्यात आले.
३. हा केवळ विधानसभा अध्यक्षांचाच नाही, तर या सदनात बसणार्या प्रत्येक सदस्याचा अवमान आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभा नियम २७३ आणि २७४ अन्वये मी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव प्रविष्ट करत आहे. तो मान्य करून कठोर कारवाई करावी.