मातृभाषेतून आकलन चांगले होते ! – डॉ. सुधीर एम्. देशपांडे

खेड न्यायालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

रत्नागिरी, १ मार्च (जिमाका) – मातृभाषेतून आकलन चांगले होते. प्रत्येक व्यक्तीने मराठीचे मूळ आत्मसात करणे आवश्यक आहे. भाषा जन्माला आली की, ती सहजासहजी नष्ट होत नाही. जेवढे शक्य असेल तेवढे मराठीचा उपयोग केला पाहिजे, असे उद्गार खेड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश १ डॉ. सुधीर देशपांडे यांनी काढले.


खेड तालुका विधी सेवा समितीच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. देशपांडे बोलत होते.
या वेळी विधीज्ञ एम्.एम्. जाडकर म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाने इ.एस्.सी.आर्. प्रणाली अंगीकारली आहे. त्यामुळे आता सर्व भाषांमध्ये निकाल उपलब्ध असून, मराठी भाषेमध्येपण तो उपलब्ध आहे. मराठी भाषा प्रतिदिन वापराची कार्यालयीन भाषा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषा संवर्धन आणि वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.’

विधीज्ञ ए.पी. माळशे यांनी, कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ या दिवशी झाला. त्यांनी मराठी भाषेमध्ये साहित्य, तसेच मराठी भाषेतून कवितांची निर्मिती केली आहे. मराठी माणसांनी मराठीतून बोलण्यातल्या चुका टाळल्या पाहिजेत. मराठी भाषा ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.

कनिष्ठ लिपीक आर्.एम्. पाटील यांनी सांगितले की, कुसुमाग्रज यांनी त्यांच्या साहित्यातून क्रांतीची प्रेरणा सर्वांच्यात निर्माण केली. त्यांनी मराठी भाषेची थोरवी आपल्या कवितेतून वर्णन केली आहे.