मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांचे ‘विशेष अन्वेषण समिती’द्वारे अन्वेषण करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

  • आमदार आशिष शेलार आणि विजय वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी ! 

  • विधानसभेचे कामकाज ५ मिनिटांसाठी स्थगित !

श्री. सचिन कौलकर, प्रतिनिधी, मुंबई.

मुंबई, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील माझ्याविषयी जे काही बोलले, त्यानंतर मराठा समाज त्यांच्या नाही, तर माझ्या पाठीशी उभा राहिला. त्यांच्या पाठीमागचा बोलविता धनी कोण आहे, हे शोधून काढणारच. सगळी चौकशी करून हे षड्यंत्र बाहेर काढले जाईल. या संपूर्ण प्रकरणाचे विशेष अन्वेषण यंत्रणेद्वारे (‘एस्.आय.टी.’द्वारे) अन्वेषण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचे सूत्र सभागृहात उपस्थित करण्यात आले. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी चौकशीची मागणी केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याची ‘एस्.आय.टी.’द्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशातही उमटले. २७ फेब्रुवारी या दिवशी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून भाजपचे नेते आशिष शेलार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात खडाजंगी झाली.

 

  • मनोज जरांगे पाटील यांच्याकडून दिलगिरी व्यक्त !

  • मी शिव्या दिल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो !

    मनोज जरांगे-पाटील

अंतरवाली सराटी – आंदोलन चालू असतांना काहीतरी अनावधानाने होते. मी कुणालाही आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नाहीत. मी शिव्या दिल्या असतील आणि ती गोष्ट फडणवीसांना लागली असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. केवळ ते शब्द मागे घेतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

विधानसभेचे कामकाज ५ मिनिटांसाठी स्थगित !

‘मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन, त्यांच्या बोलण्याची चुकीची भाषा, त्यांना आंदोलनात कोण साहाय्य करते ? त्यांचा बोलविता धनी कोण आहे, त्याचा शोध घ्यावा’, असे अनेक प्रश्न उपस्थित करत सत्ताधार्‍यांनी सरकारलाच धारेवर धरून विधानसभेतील मोकळ्या जागेत येऊन गोंधळ घातला. ‘अन्वेषण समिती नेमावी’, अशी मागणी भाजपचे सदस्य करत होते. विरोधी सदस्य ‘जरांगे यांच्या आंदोलनात केलेल्या ‘लाठीमार’ प्रकरणाचे अन्वेषण करावे’, अशी मागणी करत होते. त्यातून सभागृहांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज ५ मिनिटांसाठी स्थगित केले.

मराठा समाजाविषयी मला कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘माझ्या मनात मनोज जरांगे यांच्याविषयी राग नाही. मी मुख्यमंत्री असतांना मराठा समाजाचे ५६ मोर्चे अगदी शांततेत झाले; परंतु हे आंदोलन पहिल्यापासून आक्रमक होते. सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाविषयी मी काय केले, ते ठाऊक आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण मी मुख्यमंत्री असतांना सर्वाेच्च न्यायालयातही टिकले. आता सध्याच्या आंदोलनामागील षड्यंत्र बाहेर येत आहे. कशा प्रकारे रात्री जाऊन मनोज जरांगे यांना परत आणणारे कोण आहेत ? त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत ? कुणाकडे बैठक झाली ? ते आरोपीच सांगत आहेत. कुणी दगडफेकीचे आदेश दिले ? पोलीस आपले नाहीत का? आपल्या पोलिसांना मारायचे आणि आपण चूप बसायचे ? समाजाचे तुकडे करण्याचे प्रयत्न होत आहेत.’’

मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण ? – आशिष शेलार, आमदार, भाजप

आशिष शेलार

विधानसभेत औचित्याचे सूत्र उपस्थित करतांना आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अजय गडकरी आणि शाम चांडक यांनी सरकारला टिप्पणी केली की, या मराठा आंदोलनाच्या वेळी बघ्याची भूमिका घेऊ नये. योग्य ती कारवाई करावी. महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा आणि कारस्थान करण्याचे नियोजन केले आहे का ? असा संशय येतो. ही धमकी आहे का ? यामागे कोण आहे ? राज्यात कट रचला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची भाषा ही अतिशय चुकीची आहे. मराठा समाजाला अपकीर्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. मनोज जरांगे यांच्या मुखातून कोण बोलत आहे ? त्यांचा बोलवता धनी कोण ? आंदोलनांच्या वेळी येणारे जेसीबी कुणाचे ? ते कोणत्या कारखान्यांतून येतात ? त्यांच्यामागे कोण आहे ? पैसा कुठून येतो ? याची विशेष अन्वेषण समिती नेमून अन्वेषण झाले पाहिजे.

राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्र संपवण्याच्या भाषेचे समर्थन कुणीही करणार नाही; परंतु आंदोलकांवर लाठीमार का झाला ? जरांगे यांच्यावर आरोप करणारे कोण ? याचेही अन्वेषण व्हावे.’’