Ukraine Appeal To India : युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारताने महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्यक !

युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्री इरिना बोरोव्हेट्स यांचे भारताला आवाहन !

युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्री इरिना बोरोव्हेट्स

कीव (युक्रेन) – युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये चालू असलेल्या युद्धाला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त युक्रेनने भारताला युद्धाचा शांततापूर्ण अंत करण्यासाठी तोडगा शोधण्याचे आवाहन केले आहे. ‘रशियाविरुद्ध चालू असलेल्या युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारताला महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल’, असे युक्रेनने म्हटले आहे. युक्रेनने भारताचे ‘जागतिक नेता’ आणि ‘ग्लोबल साऊथ’चा (दक्षिण गोलार्धातील देश) आवाज’ म्हणून वर्णन केले आहे. याआधी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनीही ‘भारत युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करील’, अशी आशा व्यक्त केली होती.

१. युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्री इरिना बोरोव्हेट्स म्हणाल्या की, भारत आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्याची भूमिका बजावत आहे. त्यामुळे त्याच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. भारताचे रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. सर्वप्रथम भारत हा जागतिक नेता आहे, जो युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेचा आदर करतो. रशिया-युक्रेन युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी तो अधिक ठाम कृती करू शकतो. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनाही सांगितले होते की, ‘हे युद्धाचे युग नाही.’ या विधानाला जगभरातून पाठिंबा मिळाला. युक्रेनने भारताला मार्चमध्ये स्वित्झर्लंडमध्ये होणार्‍या ‘ग्लोबल पीस समिट’साठी आमंत्रित केले आहे.

२. यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले होते की, पंतप्रधान मोदी रशिया-युक्रेन वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला पंतप्रधान मोदी यांची भूमिका समजते. याचा उल्लेख आम्ही अनेक प्रसंगी केला. मला ठाऊक आहे की, भारत शांततेने समस्येचे निराकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आम्ही दोघेही विकासाच्या नव्या आयामांना स्पर्श करत आहोत.