Yana Mir exposed Pakistan : काश्मीरमधील लोक पूर्ण सुरक्षित असून पाकिस्तान अपकीर्ती करत आहे !

काश्मीरमधील महिला पत्रकार याना मीर यांनी ब्रिटनच्या संसदेत सुनावले !

काश्मीरमधील महिला पत्रकार याना मीर

लंडन (ब्रिटन) – भारताचा भाग असलेल्या काश्मीरमध्ये लोक पूर्णपणे सुरक्षित आणि मुक्त आहेत. मी मलाला युसूफझाई नाही, जिला आतंकवादाच्या भीतीने आपलाच देश (पाकिस्तान) सोडावा लागला. मी भारतात मुक्तपणे विचार मांडू शकते आणि सुरक्षित राहू शकते. पाकिस्तान काश्मीरविषयी चुकीचा प्रचार करत आहे, अशा शब्दांत भारताच्या काश्मीरमधील कार्यकर्त्या आणि पत्रकार याना मीर यांनी पाकिस्तानवर टीका केली. त्यांनी या वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याचा तीव्र निषेध केला. या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. याना मीर लंडनमध्ये ब्रिटीश संसदेने आयोजित केलेल्या ‘रिझोल्यूशन डे’मध्ये बोलत होत्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना ‘जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये फूट पाडणे थांबवावे’, असेही आवाहन केले.

याना मीर म्हणाल्या की,

१. माझी जन्मभूमी काश्मीर जो भारताचा भाग आहे तो सुरक्षित आहे. मला कधीही पळून जाऊन इतर देशात आश्रय घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

२. मी मलाला युसुफझाई कधीच होणार नाही; पण मलाला हिला ‘पीडित’ म्हणवून माझ्या देशाची, माझ्या पुरोगामी मातृभूमीची अपकीर्ती करण्याच्या कृतीवर माझा आक्षेप आहे. सामाजिक माध्यम आणि आंतरराष्ट्रीय माध्यम यांचे प्रतिनिधी ज्यांनी कधीही भारतातील काश्मीरला भेट देण्याची तसदी घेतली नाही, अशांनी दुष्प्रचार करण्यावर माझा आक्षेप आहे. अशा लोकांनी काश्मीरमध्ये न येता बाहेर थांबून अत्याचाराच्या दंतकथा रचल्या.

३. मी तुम्हाला धर्माच्या आधारावर भारतियांचे विभाजन करणे थांबवण्याची विनंती करते. आम्ही तुम्हाला आमची एकी तोडू देणार नाही.

४. या वर्षी ‘रिझोल्यूशन डे’ निमित्त मला आशा आहे की, ब्रिटन आणि पाकिस्तान येथे रहाणारे आमचे गुन्हेगार आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यम किंवा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मंच यांवर माझ्या देशाची अपकीर्ती करणे थांबवतील.

५. आतंकवादामुळे सहस्रो काश्मिरी मातांनी त्यांचे पुत्र गमावले आहेत. माझ्या काश्मिरी समुदायाला शांततेत जगू द्या. धन्यवाद आणि जय हिंद.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानच नव्हे, तर भारतातील तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्षही हेच करत आहेत !