Work From Home : कर्मचार्‍यांनी घरातून काम केल्यास वैयक्तिक आणि संस्थात्मक वाढीस चालना मिळत नाही ! – क्रितीवासन्, टाटा कन्सलटन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी

टाटा कन्सलटन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रितीवासन् यांचे वक्तव्य

के. क्रितीवासन्

मुंबई – कोरोना महामारीच्या काळात अनेक आस्थापनांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याची (‘वर्क फ्रॉम होम’ची) सुविधा दिली होती. ही सुविधा अजूनही अनेक आस्थापनांमध्ये चालू आहे. कामाची ही पद्धत कर्मचारी आणि आस्थापने यांच्या मुळावर उठल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. आता ‘टाटा कन्सलटन्सी सर्व्हिस्’चे (टी.सी.एस्.चे) मुख्य कार्यकारी अधिकारी के. क्रितीवासन् यांनी घरातून काम करण्याची पद्धत बंद करण्याचे आवाहन केले आहे. घरातून काम केल्यास वैयक्तिक आणि संस्थात्मक वाढीस चालना मिळत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ते ‘नॅसकॉम’ कार्यक्रमात बोलत होते.

क्रितीवासन् पुढे म्हणाले की,

१. ‘टी.सी.एस्.’ संघभाव आणि कर्मचार्‍यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे यांना  महत्त्व देते. कर्मचारी कार्यालयात आलेच नाहीत, तर ते आस्थापनाची मूल्ये आणि संस्कृती कशी आत्मसात करतील ?

२. ‘अधिकारी आणि वरिष्ठ कर्मचारी कसे काम करतात ?’, हे पाहून इतर कर्मचारी काम शिकत असतात. ‘टी.सी.एस्.’ ‘वर्क फ्रॉम होम’चे समर्थन करत नाही; कारण पारंपरिक कार्यालयीन वातावरणच सर्वांत प्रभावी पद्धत आहे.

‘टी.सी.एस्.’च्या कर्मचार्‍यांना कार्यालयात येण्यासाठी चेतावणी !

‘टी.सी.एस्.’मध्येही कोरोना महामारीच्या काळात कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा देण्यात आली होती; परंतु जनजीवन सुरळीत झाल्यावरही अनेक कर्मचारी कार्यालयांमध्ये परतले नाहीत. त्यामुळे कंपनीने अशा कर्मचार्‍यांना कार्यालयात येण्याविषयी निर्वाणीची चेतावणी (अल्टिमेटम) दिली होती.