Stop Harassing Chinese : चिनी विद्यार्थ्यांना त्रास देणे थांबवा ! – चीन

  • चीनने अमेरिकेला दिली तंबी !

  • चिनी लोक अमेरिकेत हेरगिरी करत असल्याची अमेरिकेला भीती !

डावीकडून अलेजांद्रो मेयोर्कास आणि वांग शिओहोंग

व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) – चीनने अमेरिकेला चिनी विद्यार्थ्यांचा छळ थांबवण्यास सांगितले आहे. येथे दोन्ही देशांचे नेते आणि अधिकारी भेटले. या वेळी चीनचे सार्वजनिक सुरक्षामंत्री वांग शिओहोंग यांनी अमेरिकेचे ‘होमलँड सिक्युरिटी’चे सचिव अलेजांद्रो मेयोर्कास यांना सांगितले की, कागदपत्रे असूनही अमेरिकी विमानतळांवर चिनी विद्यार्थ्यांची कडक चौकशी केली जाते. अनेक वेळा त्यांना चीनमध्ये परत पाठवले जाते. कोणतेही कारण नसतांना इतके कठोर असणे योग्य नाही. ते पुढे म्हणाले की, अमेरिकेने चिनी नागरिक आणि विद्यार्थी यांचा भेदभाव न करता त्यांना सन्मानाने प्रवेश मिळेल, याची निश्‍चिती केली पाहिजे.

हे आहेत अमेरिकेचे चीनवरील आरोप !

१. अमेरिकी वृत्तपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, अलीकडच्या वर्षांत चिनी नागरिक अमेरिकेत पर्यटक म्हणून जातात; मात्र तेथे हेरगिरी करतात. अहवालानुसार चिनी नागरिक अमेरिकेतील संवेदनशील माहिती गोळा करतात आणि नंतर ती चीनला पाठवतात.

२. अमेरिका चीनकडून औषधे आयात करते. चीनमधून निर्यात होणार्‍या औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फेंटॅनाइल’ नावाचे रसायन असते. या माध्यमातून अमेरिकेत अमली पदार्थांच्या व्यापाराला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप अमेरिकेने चीनवर केला होता. अमेरिकेत ‘फेंटॅनाइल’च्या वापरामुळे प्रतिवर्षी ७० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.