Bangladesh Rohingya Refugees : रोहिंग्या आमच्यासाठी ओझे बनल्याने त्यांना देशात घेणार नाही ! – बांगलादेश

नवी देहली – आम्ही यापुढे कोणत्याही रोहिंग्यांना देशात येऊ देणार नाही. ते आधीच आमच्यासाठी ओझे बनले आहेत, अशा शब्दांत बांगलादेशाचे रस्ते वाहतूक आणि पूल मंत्री ओबेदुल कादीर यांनी सांगितले. रोहिंग्यावरून बांगलादेशाला येणार्‍या समस्येवरून पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी ही माहिती दिली. ‘देशाला मिळणारे विदेशी साहाय्य आधीच अल्प झाले आहे; मग अशा लोकांना आधार कसा मिळणार?’, असा प्रश्‍नही कादीर यांनी उपस्थित केला.

बांगलादेशाचे रस्ते वाहतूक आणि पूल मंत्री ओबेदुल कादीर

आमच्या सुरक्षेसाठी रोहिंग्या धोकादायक आहेत !

बांगलादेशाचे शरणार्थी साहाय्य आणि प्रत्यार्पण आयुक्त महंमद मिझानूर रहमान म्हणाले की, म्यानमारमधील सरकार आणि बंडखोर यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सहस्रो लोक बांगलादेशात प्रवेश करण्यासाठी म्यानमार सीमेवर जमले आहेत. त्यांपैकी बहुतांश चकमा समाजाचे लोक आणि रोहिंग्या आहेत. बांगलादेश आधीच रोहिंग्यांच्या ओझ्याखाली दबला आहे. या घटनेला ७ वर्षे झाली असून अद्यापपर्यंत बांगलादेशात असलेल्या रोहिंग्यांना त्यांच्या देशात पाठवण्यात आलेले नाही. आता हे लोक आमच्यासाठी, आमच्या सुरक्षेसाठी धोकादायक बनले आहेत.

संपादकीय भूमिका 

बांगलादेशामध्ये अनुमाने ८ लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमान शरणार्थी म्हणून गेल्या काही वर्षांपासून रहात आहेत. त्यांच्या वर्तणुकीवरूनच बांगलादेश आता आणखी रोहिंग्याना प्रवेश देऊ पहात नाही, हे स्पष्ट आहे. ‘भारत देशात असणार्‍या रोहिग्यांना कधी हाकलणार ?’ हा प्रश्‍न अद्याप अनुत्तरितच आहे !