‘सध्या ‘थायरॉईड’ हे नाव सर्वांच्या परिचयाचे आहे. ‘थायरॉईड’चा त्रास आहे आणि त्यासाठी गोळी घ्यावी लागते, हे आपण बर्याच जणांविषयी ऐकतो. ‘थायरॉईड’ म्हणजे एक ग्रंथी आहे आणि तिचे आपल्या शरिरात पुष्कळ महत्त्वाचे कार्य आहे. या ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाल्यास त्याचे बरेच दुष्परिणाम आहेत. याचे वेळीच निदान होणे, योग्य औषधोपचार घेणे महत्त्वाचे ठरते. आजच्या लेखात आपण ‘थायरॉईड’ ग्रंथी, तिचे कार्य आणि ती अकार्यक्षम झाल्यास काय दुष्परिणाम होतात, ते समजून घेणार आहोत.
१. ‘थायरॉईड’ ग्रंथीचे कार्य
‘थायरॉईड’ ही एक अंतःस्रावी ग्रंथी आहे. ही गळ्यामध्ये स्वर यंत्राच्या मागे असते. या ग्रंथीकडून जे स्राव निर्माण होतात त्यांना अंतःस्राव (Hormone) म्हणतात. हे अंतःस्राव निर्माण करण्यासाठी ग्रंथीला ‘आयोडीन’ आणि प्रथिने यांची आवश्यकता असते. या ग्रंथीच्या कार्यावर डोक्यामध्ये असणार्या ‘पिट्युटरी’ ग्रंथी आणि ‘हायपोथलामस’ (मेंदूचा एक भाग) यांचे नियंत्रण असते. आपल्या शरिरातील ग्रंथी एकमेकांच्या सहकार्याने शरीर व्यापार चालवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
२. अंतःस्रावांचे आपल्या शरिरातील कार्य
अ. आपण घेत असलेल्या आहारातून स्वतःला पिष्टमय आणि स्निग्ध पदार्थ मिळतात. त्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. त्यांचे चयापचय करून ऊर्जा मिळवण्यासाठी ‘थायरॉईड’च्या अंतःस्रावांची आवश्यकता असते.
आ. रक्तातील साखरेची पातळी वाढवणे.
इ. हृदयाची गती नियंत्रित ठेवणे.
ई. पाचक स्राव वाढवून योग्य पचन घडवून आणणे.
उ. स्नायूंच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे.
ऊ. यासमवेत या अंतःस्रावांचा परिणाम झोपेवर होतो.
ए. स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित येण्यासाठी अप्रत्यक्षरित्या ‘थायरॉईड’चे अंतःस्राव कामगिरी बजावत असतात.
ऐ. रक्त आणि हाडे यांमधील कॅल्शियमचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्याचे कामही ‘थायरॉईड’ ग्रंथीचे अंतःस्राव करत असतात.
ओ. मेंदूचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी आणि बौद्धिक कामे सुरळीत होण्यासाठीही ‘थायरॉईड’ ग्रंथी महत्त्वाचे कार्य करत असते.
३. थायरॉईड या ग्रंथीच्या कार्यक्षमतेसंबंधी
थायरॉईड या ग्रंथीच्या कार्यक्षमतेनुसार याच्या २ विकृती संभवतात –
अ. थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम होणे (Hypothyroidism)
आ. थायरॉईड ग्रंथीचे अतीकार्य (Hyperthyroidism)
जेव्हा ‘थायरॉईड’ ग्रंथीकडून अंतःस्रावाचे (‘T3’ आणि ‘T4’ या नावाने ओळखले जाणारे स्राव) रक्तातील प्रमाण न्यून होते, तेव्हा त्याला ‘थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम होणे’ (hypothyroidism), असे म्हणतात. ‘T3’ आणि ‘T4’ हे स्राव सिद्ध करण्यासाठी आयोडीनची आवश्यकता असते. आयोडीन जेव्हा आहारातून मिळत नाही, तेव्हा ‘थायरॉईड’ ग्रंथीचे कार्य न्यून होते. यामुळे ‘थायरॉईड’ ग्रंथीचा आकारही वाढू शकतो. समुद्रसपाटीपासून उंच आणि थंड हवेच्या प्रदेशांमध्ये आयोडीनची कमतरता असते. तिथे ‘थायरॉईड’ ग्रंथीचा आकार वाढण्याची शक्यता अधिक असते.
४. अंतःस्रावाचे प्रमाण न्यून झाल्याने शरिरात दिसणारी लक्षणे
अ. वजन वाढायला लागते.
आ. रक्तदाब (blood pressure) वाढतो.
इ. अशी व्यक्ती आळशी बनते. हा विकार झालेली व्यक्ती पुष्कळ झोपते.
ई. आवाज घोगरा होतो आणि जीभ जड होते.
उ. अशा व्यक्तीला बुद्धीमांद्य येते.
ऊ. डोळ्यांभोवती सूज येते.
ए. स्त्रियांमध्ये पाळीचे त्रास चालू होतात.
यासमवेत वजन वाढत आहे, झोप येत आहे, अशी लक्षणे दिसत असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
५. ‘थायरॉईड’चे अतीकार्य (Hyperthyroidism)
यामध्ये ‘थायरॉईड’ ग्रंथीचे अंतःस्रावाचे प्रमाण वाढते. त्यामुळे अंतःस्रावाचे जे कार्य आपण बघितले, ते जलद गतीने व्हायला लागते.
अ. नेहमीसारखी भूक असूनही आणि प्रमाणात जेवून सुद्धा व्यक्तीचे वजन न्यून होऊ लागते.
आ. रात्री झोप येत नाही.
इ. स्वभाव रागीट बनतो.
ई. अशा व्यक्तींना उष्ण वातावरण अजिबात सहन होत नाही.
उ. अत्याधिक घाम येऊ लागतो.
ऊ. रुग्ण अंगकाठीने बारीक होत जातो आणि तणावाखालीच जगतो.
ए. रुग्णाच्या हातांना कंप सुटतो.
ऐ. डोळे खोबणीच्या बाहेर आल्यासारखे दिसतात.
आजच्या लेखात आपण ‘थायरॉईड’चे अकार्यक्षम असणे आणि अतीकार्य असतांनाची लक्षणे बघितली. पुढच्या लेखामध्ये आपण ‘थायरॉईड’च्या दृष्टीने सुयोग्य जीवनशैली बघणार आहोत.’
(क्रमशः पुढच्या बुधवारी)
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (६.२.२०२४)