रामायणातील धर्मपालन !

श्रीरामांना ‘विग्रहवान धर्मः’ असे म्हटले आहे. श्रीरामाचा शत्रू मारिच यानेही रावणाला सांगितले होते, ‘रामो विग्रहवान धर्मः ।’ म्हणजे राम हेच धर्माचे खरे रूप आहे. शांततेच्या काळात राम सर्वांशी करूणा, प्रेम आणि आदराने वागला. कठीण काळात त्याने सामूहिक हिताचे निर्णय घेतले आणि स्वेच्छेने स्वतःसाठी कठीण जीवन निवडले; म्हणूनच राम सहस्रो वर्षांपासून सर्वांना प्रिय आहे. केवळ भारतातच नाही, तर जिथे जिथे रामायणाचे वाचन, कथन केले जाते, त्या प्रत्येक ठिकाणी श्रीरामाला पुष्कळ लोकप्रियता मिळते.

संपूर्ण रामायण हे धर्माचे वर्णन आहे. श्रीराम सगळ्यांशी जिव्हाळ्याने, प्रेमाने आणि बंधूभावाने वागला. समाजाचे हित निवडून स्वसुख आणि ऐषोआराम यांचा त्याग केला. मग प्रश्न पडतो की, श्रीरामाने सीतेला अग्नीपरीक्षेला सामोरे जाण्यास का सांगितले ? प्रत्यक्षात श्रीरामाने सीतेला अग्नीपरीक्षा देण्यास सांगितलेच नाही. यासंदर्भातील कथा आपण जाणून घेऊया !

१. श्रीरामाने केलेल्या सूचनांविषयी सांगत हनुमानाने सीतेला समजावणे

जेव्हा श्रीरामाने हनुमानाला लंकेतील सीतेचे विचार जाणून घेण्यासाठी पाठवले, तेव्हा हनुमानाने श्रीरामाकडे येऊन सीतेला श्रीरामाचे दर्शन घ्यायचे असल्याचे सांगितले. श्रीराम डोळे मिटून बराच वेळ ध्यानात मग्न होता. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. शेवटी एक उसासा टाकत हनुमानाला गंभीर स्वरात म्हणाले, ‘‘विभिषणाची अनुमती घेऊन सीतेला स्नान घालून, दागिन्यांनी सजवून घेऊन ये.’’ अशोक वृक्षाखाली अनेक महिने बसलेल्या सीतेला त्याच वेशात श्रीरामाला भेटायचे होते; परंतु हनुमानाने सीतामातेला समजावले की, श्रीरामाच्या सूचनांचे पालन करणे हितावह होईल.

२. वर्षभर लंकेत राहिलेल्या सीतेविषयी लोक काहीही बोलतील, याची कल्पना श्रीरामाला असणे

श्रीरामाला ठाऊक होते की, सीता लंकेतून परतल्यानंतर लोकांच्या बोलण्यावर कुणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. लोक या सर्व गोष्टींकडे कसे पहातील ? सीतेला माहीत होते की, श्रीराम एकट्याने १४ सहस्र राक्षसांना मारू शकतो. राम मारीच राक्षसालाही सहज यमसदनी धाडू शकतो. खरेतर हे राक्षस मायावी असल्याचेही तिला ठाऊक होते, तरीही तिने लक्ष्मणाला श्रीरामाच्या साहाय्याला जाण्यासाठी आश्रम सोडण्यास भाग पाडले. मग सीतेचे अपहरण झाले कि तिनेच रावणासोबत जाण्यासाठी लक्ष्मणाला पाठवले, हे कुणास ठाऊक ? जरी आपण मानले की, तिचे अपहरण झाले; पण रावणाचे व्यक्तीत्व असे होते की, तो कोणत्याही स्त्रीला वश करू शकत होता. सीता जवळपास वर्षभर लंकेत राहिली, मग काय झाले असेल ? तरीही श्रीराम तिला स्वीकारत आहे; कारण तो तिच्या सौंदर्याने मोहीत झाला आहे आणि समाजातील नैतिकतेची पर्वा करत नाही. अशा पद्धतीने लोक बोलतील, हे श्रीरामाला ठाऊक होते.

३. श्रीरामाविना अस्तित्व निरर्थक असल्याने सीतेने अग्नीत उडी घेणे आणि अग्नीने तिला न जाळणे

लोकांच्या आक्षेपामुळेच सीता स्वेच्छेने आश्रमातून गायब झाली असावी किंवा तिने स्वेच्छेने आश्रम सोडला असावा, अशी थोडीशी शक्यता रामाला विचारात घ्यावी लागली असावी. रावणाच्या वधानंतर श्रीराम सीतेला म्हणू शकला नसता की, आता तू माझी आहेस. त्यामुळे तो सीतेला म्हणाला, ‘माझ्या कुटुंबाच्या सन्मानासाठी मी रावणाशी युद्ध केले, आता तुला पाहिजे तेथे जाण्यास तू स्वतंत्र आहेस.’ श्रीरामाच्या या वागण्याने सीतेला आश्चर्य वाटले. सीतेने रामाला तिच्या लग्नाच्या व्रताची, तरुणपणी झालेल्या लग्नाची आणि इतक्या वर्षांच्या तिच्या वैवाहिक जीवनाची आठवण करून दिली; पण श्रीरामाने सीतेकडे पाहिलेही नाही. याचे सीतेला पुष्कळ वाईट वाटले. ‘रामाविना आपले अस्तित्व निरर्थक आहे’, असे तिला वाटू लागले. सीतेने अग्नीत उडी घेतली. मग अग्नीदेव प्रकट होऊन म्हणाले, सीता अग्नीपेक्षा शुद्ध आहे. मी तिला जाळू शकत नाही.

३ अ. अग्नीप्रवेशाचा निर्णय हा केवळ सीतेचा असणे : आपण हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की, श्रीरामाने सीतेला तिची शुद्धता सिद्ध करण्यास सांगितले नव्हते. जेव्हा सीतेने अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा रामाला ठाऊक होते की, सीता शुद्ध आहे. तिला काहीही होणार नाही, हे त्यांनी अग्नीलाही सांगितले होते. अशा प्रकारे अग्नीप्रवेश हा सीतेचा निर्णय होता. तेथून ते सर्वजण आनंदाने अयोध्येला परतले.

४. अग्नीप्रवेशाच्या घटनेविषयी लोक सीतेविषयी अभद्र बोलू लागणे

अयोध्येतील लोकांना सीतेच्या अग्निप्रवेशाची कल्पना नव्हती. सीतेच्या अग्नीप्रवेशाची घटना इतकी वेदनादायक होती की, अयोध्येला परतल्यावर हनुमान किंवा लक्ष्मण या दोघांनाही हा वृत्तांत आपल्या वाणीने देता आला नाही. हळूहळू अयोध्येतील लोक सीतेविषयी वाईट बोलू लागले. ते म्हणू लागले, ‘स्त्री तिचे घर सोडू शकते. कित्येक महिने एखाद्यासोबत राहू शकते आणि नंतर तिच्या घरी परत येऊ शकते. सीता अतिशय सुंदर असल्याने राम या मोहातून बाहेर पडू शकला नाही. त्यामुळे सीता रावणाच्या सोबत राहिली, तरीही रामाने सीतेला स्वीकारले. संपूर्ण समाजाची नैतिकता पणाला लागली. यानंतर समाजातील सर्व महिला याच पद्धतीने वागतील.’

५. लोकांच्या बोलण्यामुळे श्रीरामाने कौटुंबिक सुखाचा त्याग करत सीतेला वाल्मिकींच्या आश्रमात पाठवणे

श्रीरामाला हे लक्षात आले. त्याला जरी सत्य ठाऊक असले, तरी राजाचे संपूर्ण कार्य लोकांना योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असायला हवे. कौटुंबिक सुख आणि समाजातील नैतिकता यांच्यात संघर्ष पेटला होता. धर्मानुसार जेव्हा दोन घटकांच्या किंवा गटांच्या हितसंबंधांमध्ये संघर्ष होतो, तेव्हा मोठ्या गटाच्या हितांना प्राधान्य दिले पाहिजे आणि लहान गटाच्या हिताचा त्याग केला पाहिजे. श्रीरामाने त्याच्या कौटुंबिक सुखाचा त्याग केला. त्यांनी लक्ष्मणाला सीतेला घेऊन वाल्मिकींच्या आश्रमाजवळ सोडण्यास सांगितले.

श्रीरामाने सीतेचा त्याग केला नाही. श्रीरामाने सीतेला सोडले असते, तर त्याने पुनर्विवाह केला असता. दशरथ राजाला ३ बायका होत्या. रामही पुन्हा लग्न करू शकत होता; पण त्याने तसे केले नाही.

६. सीतेची सिद्ध मूर्ती बाजूला ठेवून यज्ञ करणारा श्रीराम !

यज्ञाच्या वेळी सीता समवेत नसल्याने त्यांनी सीतेची मूर्ती घडवून आणण्यास सांगितली. सीतेची मूर्ती जवळ ठेवून त्यांनी यज्ञ केला. लोक म्हणतात, ‘रामाने सीतेला सोडले; पण त्याने सीतेला सोडले नाही, उलट समाजहितासाठी त्याने कौटुंबिक सुखाचा त्याग केला.’ श्रीराम आणि सीता यांनी वेगळे राहून तपश्चर्या केली.

७. अयोध्यावासियांसमोर श्रीरामाने शुद्धतेचे प्रमाण देण्यास सांगितल्यावर सीतेने धरणीमातेत सामावून घेणे 

जेव्हा सीता श्रीरामाच्या विनंतीनुसार, महर्षी वाल्मिकींसमवेत रामाच्या दरबारात गेली, तेव्हा रामाने तिला अयोध्येतील लोकांसमोर तिच्या शुद्धतेचे प्रमाण देण्यास सांगितले. सीतेच्या आतील तेज पहा ! तिने लोकांची तोंडे कायमची बंद करण्यासाठी काय केले ! तिने पृथ्वीमातेची प्रार्थना करून स्वतःला धरणीत सामावून घेण्याची विनवणी केली. कसलीही याचना केली नाही, ना कुणाला दोष दिला, नाही सुखसोयी आणि ऐषोआराम यांची लालसा दर्शवली ! धर्मपत्नी, राणी आणि माता या नात्यांनी तिने सर्व कर्तव्ये पार पाडली. लव-कुशचे उत्तम संगोपन करून त्यांना श्रीरामांच्या स्वाधीन केल्यानंतर तिने मोक्षप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग केला.

८. श्रीराम आणि सीता यांचे अपार त्यागमयी जीवन

‘आत्मार्थे पृथीवीं त्यजेत् ।’ (स्वतःसाठी पृथ्वीचाही त्याग करावा लागतो.) सीतेच्या मुलांना त्यांच्या आईविषयी कधीही वाईट ऐकावे लागले नाही. ती अयोध्येतील लोकांची रक्षकदेवी झाली, ज्यांनी तिच्या चारित्र्यावर शंका घेतली. त्यामुळे आजही रामसीतेची कथा जगाच्या कानाकोपर्‍यात लोकप्रिय आहे. त्यांनी समाजाप्रती केलेल्या अपार त्यागामुळेच सीता आणि श्रीराम यांचे जीवन तमाम भारतियांच्या हृदयाला कायमचे स्पर्श करून गेले.

९. सातासमुद्रापार गेलेले रामायण

सीता आणि श्रीराम यांची कथा इतकी व्यापक आहे की, अनेक समुदायांचे स्वतःचे रामायण आहे. इंडोनेशिया, मलेशिया आणि कंबोडिया या देशांमध्ये ‘रामायण’ हे काव्य राष्ट्रीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तेथील लोकांना इस्लाम पंथ स्वीकारावा लागला, तरीही रामायणातील गाणी आणि रामायणातील दृश्ये त्यांच्या कौटुंबिक अन् सामाजिक उत्सवांचा अविभाज्य भाग आहेत. इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया आणि व्हिएतनाम येथेही अनेक लोक रामायण साजरे करतात.

श्रीराम आणि सीता यांनी आपल्याला धर्माचा परिपाठ घालून दिला आहे. प्रभु श्रीराम आणि माता सीता यांची पूजा केली जाते; कारण त्यांच्यामध्ये दिव्यत्व पूर्णपणे प्रकट झाले आहे.

– बी. निवेदिता, राष्ट्रीय उपाध्यक्षा, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी (अनुवाद : सुजय निकते) (साभार : मासिक ‘विवेक विचार’, दीपावली विशेषांक, नोव्हेंबर २०२४)


सीतेची कठोर तपश्चर्या !

सीतेला वाल्मिकींच्या आश्रमात पाठवण्याच्या श्रीरामाच्या निर्णयात तिला अन्याय दिसला नाही. ती लक्ष्मणाला म्हणाली, ‘‘रामाला राजाचे कर्तव्य बजावू द्या. मी आई म्हणून माझे कर्तव्य पार पाडेन.’’ सीतेने लक्ष्मणाला रामाला कळवायला सांगितले की, अयोध्येतील लोकांवर रागावू नये, त्यांची सेवा करावी. त्यांना त्यांच्या भावांप्रमाणे स्नेह द्यावा.’’ जुळ्या मुलांचे संगोपन करतांनाही सीतेने कठोर तपश्चर्या केली.