रत्नागिरी जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा
रत्नागिरी – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभा सध्या कोकणात होत आहेत. ४ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग आणि ५ फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी अन् चिपळूणमध्येही सभा पार पडली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की,
१. लोकसभा निवडणुकीत आपली येथील जागा कायम रहायलाच हवी. गद्दारांचे ‘डिपॉझिट’ जप्त करा. कुणी गद्दारी करू नये, असा धडा त्यांना शिकवा ! आम्ही येथे एका निष्ठावंताची पाठ थोपटायला आणि गद्दारांना हाकलायला आलो आहोत.
२. उद्योगमंत्र्यांचे उद्योग आम्ही पहातोय. आम्हालाच शिवसेना म्हणजे काय हे शिकवत आहेत. हेच वर्ष २०१४ मध्ये लाचारी करून शिवसेनेत आले. मी मंत्री पदाचा शब्द त्यांना दिला होता, तो पाळला आणि ते मात्र पळाले.
३. म्हणे हे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. बाळासाहेब होते तेव्हा तुम्ही आमच्या विरुद्ध आमच्याशी लढत होतात. या नतद्रष्टांनी बाळासाहेबांच्या खुर्चीचीही किंमत केली आहे; पण त्या खुर्चीत जेव्हा बाळासाहेब होते, तेव्हा त्यांनी मोदींना वाचवले होते.
४. भर पोलीस ठाण्यात जाऊन भाजपचा आमदार गोळीबार करतोय, हे ‘रामराज्य’ नाही ‘मरा राज्य’. म्हणजे आता अशा कामावर हे पुढे आहेत. हे नुसते हतबल नाहीत, तर संपले आहेत.
५. भाजपचे हिंदुत्व धर्माच्या नावाखाली घरे पेटवणारे आहे. आता हिंदुत्वातील फरक मुसलमान समाजालाही समजला आहे.
आमच्या हिंदुत्वावर कुणीही शंका घेऊ नये ! – उद्धव ठाकरेराजापूर – आमच्या हिंदुत्वावर कुणीही शंका घेऊ नये. माझे नरेंद्र मोदींशी कोणत्याही प्रकारचे वैर नाही, ते मला मानत असतील, तर त्यात माझा दोष नाही, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत केले. शहरातील जवाहर चौकात जनसंवाद सभा पार पडली. या वेळी व्यासपिठावर रश्मी ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे पुढे म्हणाले की, संकट काळात साथ देणार्या राजन साळवींचा मला अभिमान आहे. ते मिंधे गटामध्ये गेले नाहीत; म्हणून त्यांच्या मागे सुडाच्या राजकारणातून ईडीची कारवाई चालू आहे. मी लढायला उभा आहे तो माझ्यासाठी नाही, तर तुमच्यासाठी आहे. जात, पात, धर्म सगळे विसरून एकत्र येऊया आणि देशावरचे संकट दूर करूया. तरच आपल्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे म्हणण्याचा अधिकार राहील. येत्या निवडणुकीमध्ये विजयाची ‘हॅट्रीक’ साधूया. श्री देव धूतपापेश्वरला साकडे‘देशावरच आणि महाराष्ट्रावरचे अरिष्ट दूर कर.. जे धर्माच्या नावाने पाप करत आहेत, त्या सर्वांचा नायनाट कर.. ’, असे साकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री देव धूतपापेश्वराच्या चरणी घातले. मुख्यमंत्रीपदी असतांना ठाकरे यांनी श्री देव धूतपापेश्वर मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामासाठी निधी संमत केला होता. त्यांनी सपत्नीक श्री धूतपापेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी चालू असलेल्या मंदिराच्या कामाची पहाणी करत माहितीही घेतली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. |