Swami Govind Dev Giri Maharaj : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सव होणे, हे नियतीचे नियोजन ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आळंदी येथील प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने…

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज (छायाचित्र सौजन्य : Swami Govind Dev Giri)

आळंदी (जिल्हा पुणे), ५ फेब्रुवारी (वार्ता.) – २२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे श्रीराममूर्तीची प्रतिष्ठापना होणे, ही ईश्‍वराची इच्छा असून मंदिराच्या कार्याचा प्रारंभ होणे, हे आपले सौभाग्य आहे. अयोध्या येथे श्रीरामाच्या दर्शनाला प्रारंभ होणे, ही नियतीची योजना आहे. त्याप्रमाणे येथील प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रमा हे नियतीचे नियोजन आहे, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. ५ फेब्रुवारी या दिवशी आळंदी येथे प.पू. श्री गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’त ते बोलत होते.

सौजन्य : Swami Govind Dev Giri

या वेळी व्यासपिठावर पू. जगद्गुरु द्वाराचार्य स्वामी श्री राजेंद्रदासजी महाराज, पू. बालयोगी श्री सदानंदजी महाराज, पू. ह.भ.प. बंडातात्या महाराज आणि जैन मुनी लोकेश महाराज  उपस्थित होते. महोत्सवात त्यानंतर पू. जगद्गुरु द्वाराचार्य स्वामी श्री राजेंद्रदासजी महाराज यांचे श्रीमद्भागवत कथा कार्यक्रम भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला. सकाळी ८ वाजता ग्रंथ शोभायात्रा काढण्यात आली.

सौजन्य : Swami Govind Dev Giri

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की,

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

१. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ असे सांगून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती; म्हणजे नियतीप्रमाणे होणारे हे ईश्‍वरी कार्य आहे. कार्यकर्त्यांनी ईश्‍वरावर सर्व सोडून ‘त्याच्या इच्छेने सर्व काही होत आहे’, असा समर्पण भाव ठेवून कार्य केेले पाहिजे. या वेळी येथे फळाची अपेक्षा करू नये.

२.पुराण, रामायण, गीता, महाभारत या ग्रंथांतील माहितीचा चुकीचा अर्थ काढून समस्या निर्माण केली जात आहे. त्यामुळे हा धोका टाळायचा असेल, तर समाजात प्राचीन ग्रंथांची सत्य माहिती प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. ती आपण केली पाहिजे.

३. आज विश्‍वाला अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने यातून वाचण्यासाठी विश्‍वाला भारताची आवश्यकता आहे. मनुष्याला केवळ श्रद्धेमुळे ज्ञान प्राप्त होत नाही, तर तेथे भक्तीही असावी लागते.

‘मैं रहूँ या ना रहूँ, मगर मेरा भारत रहना चाहिए’ हेच माझे ध्येय आहे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

प. पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यामुळे वारकर्‍यांसाठी आळंदी परमानंद देणारे स्थान आहे. त्यामुळे आळंदी हे ठिकाण मला पुष्कळ आवडते. सहकार्‍यांचा जो सन्मान होत आहे, त्यामुळे मी आनंदी आहे, कारण हा माझाच सन्मान आहे. ‘मैं रहूँ या ना रहूँ, मगर मेरा भारत रहना चाहिए’ हेच माझे ध्येय आहे.’’

जो सहकार्‍यांच्या सन्मानात आनंद मानतो, त्याचा जग सन्मान करतो ! – जैनमुनी लोकेश महाराज

जैनमुनी लोकेश महाराज म्हणाले, ‘‘जो सहकार्‍यांचा सन्मान करतो, त्यांच्या सन्मानांमध्ये आनंद मानतो, त्याचा जग सन्मान करते. असे तेजस्वी व्यक्तीमत्त्व म्हणजे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज आहेत.’’