मराठीचे मारेकरी नव्हे, तर खरे मराठीप्रेमी आणि साहित्यिक होण्यासाठी मराठीची अस्मिता जोपासा !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्देश ‘मराठी साहित्य वृद्धींगत व्हावे, मराठी भाषा संवर्धन करत तिची अस्मिता जोपासावी, मराठी भाषेवर होणार्‍या आघातांच्या विरोधात जनमत निर्माण करून चळवळ उभी करणे, मराठीजनांना सकस साहित्य आणि विचार मिळणे’, असा असतो; मात्र सद्यःस्थितीत मराठीची सर्वच स्तरांवर दुर्दशा होतांना दिसत आहे. अजूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. मराठी शाळा बंद पडत आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र पोचलेला मराठी माणूस; पण ‘त्याची मराठीच्या संदर्भात काय स्थिती आहे’, ही विचार करण्यासारखी स्थिती आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सध्याची मराठी भाषेची दयनीय स्थिती आणि मराठी भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी मराठीप्रेमी अन् साहित्यिक यांनी करावयाचे प्रयत्न यांविषयी ‘एक मराठीप्रेमी’ म्हणून विचारमंथन करण्याचा प्रयत्न केला आहे.

२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मराठीची दुरवस्था’ याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/760734.html

२. दर्जेदार मराठी साहित्याची निर्मितीच नाही ! 

१९५० ते १९९० या कालावधीतील प्रल्हाद केशव अत्रे, ग.दि. माडगूळकर, पु.भा. भावेे, ना.सी. फडके इत्यादी काही नावे सोडली, तर त्यानंतर दर्जेदार मराठी साहित्यिक आणि दर्जेदार साहित्य निर्माण झालेच नाही. आताचे बहुतांश मराठी साहित्यिक हे पुरोगामी विचारसरणीचे, आधुनिकतेच्या नावाखाली धर्मद्रोही विचारांचा प्रसार करणारे अन् लिखाणात सर्रासपणे परकीय शब्दांचा वापर करणारे आहेत. त्यांना ना मराठीशी देणे-घेणे आणि ना आपल्या संस्कृतीशी !

३. जगाच्या पाठीवर बुद्धीमत्ता आणि कर्तृत्व यांच्या बळावर पुढे असलेला मराठी माणूस !

मराठीची दुरवस्था असली, तरी जगभरात मराठी माणसाचे योगदानही पुष्कळ अधिक आहे. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित देशांतही मोठमोठ्या आस्थापनांमध्ये मराठी माणूस मोठ्या पदांवर कार्यरत आहे. विदेशातील राजकीय क्षेत्रातही मराठी माणूस बघायला मिळतो. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे त्यातीलच उदाहरण आहे; परंतु केवळ त्याविषयी अभिमान बाळगणे आवश्यक नसून मराठीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करावा.

श्री. संदेश नाणोसकर

४. मराठीची दुरवस्था रोखण्यासाठी मराठी साहित्यिकांनी तळागाळातील मराठीची दु:स्थिती समजून घेणे आवश्यक !

मराठीला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर मराठी साहित्यिकांनी मराठीची दु:स्थिती समजून घेतली पाहिजे. केवळ साहित्य संमेलने भरवून, मराठी भाषा संचालनालय चालू करून अथवा मराठी भाषा मंत्री नेमून थांबणे योग्य होणार नाही. तळागाळातील लोकांमध्ये मराठीविषयी अभिमान निर्माण करणे, शाळा-महाविद्यालयांमध्ये मराठीचे शिक्षण देणे आवश्यक आहे. ‘गेल्या १० वर्षांपासून मराठी भाषेचे धोरण घोषित करण्याचे सरकार सतत टाळत आहे. त्यामुळे हे धोरण घोषित करण्याचा आग्रह धरणारा ठराव संमेलन करणार का ? मराठी माध्यमाच्या बंद पडणार्‍या शाळा चालू करण्यासाठी आणि चालू असणार्‍या बंद होऊ नयेत, यासाठी मागणीचे ठराव करणार का ?’, याकडे महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद जोशी यांनी पत्राद्वारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्षांचे लक्ष वेधले आहे. महामंडळाने याचा विचार करावा !

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३१.१.२०२४)

(समाप्त)

मराठीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिकांनी काय करावे ?

१. भाषाशुद्धी मोहीम राबवणे आवश्यक ! 

देवभाषा संस्कृतनंतर मराठी भाषेत सर्वाधिक सात्त्विकता आहे. परकीय शब्दांच्या वापरामुळे सात्त्विकता तर न्यून होतेच; परंतु भाषेतील गोडवाही उणावतो. मराठीवरील परकियांचे हे आक्रमण परतवून लावण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धी मोहीम राबवली होती. त्यानंतर पुन्हा कुणीच ती राबवली नाही. आता पुन्हा अशी मोठी चळवळ राबवण्याची वेळ आली आहे. मराठीच्या रक्षणासाठी साहित्यिकांनी तलवारी घ्याव्यात, असे नाही; मात्र तलवारीसारखे धारदार लिखाणही त्यांच्याकडून केले जात नाही. दिवसेंदिवस मराठी भाषेत इतके परकीय शब्द येत आहेत की, स्वकीय कोणते आणि परकीय कोणते, हेही कळेनासे झाले आहे. अनेक संमेलनाध्यक्षच अशुद्ध बोलतात, मग अशांकडून काय अपेक्षा ठेवणार ? मराठी शब्दकोश, परकीय अन् मराठी शब्द अशा प्रकारचे शब्दकोश निर्माण व्हायला हवेत. शिक्षणात त्याचा समावेश करायला हवा. लिखाणात परकीय शब्द घेतला, तर त्याच्या मूळ मराठी शब्दाचा उल्लेख लिखाणात करायला हवा. याकडे मराठी साहित्यिकांनी गांभीर्याने लक्ष देऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे !

२. दर्जेदार साहित्य निर्माण करणे

स्वातंत्र्यपूर्व, तसेच स्वातंत्र्योत्तर काळात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी अनेक राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारक यांनी आपल्या लेखणीच्या बळावर सर्वसामान्यांच्या मनात राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करण्याचे महत्कार्य केले. त्यातून प्रेरणा घेऊन अनेक क्रांतीकारक निर्माण झाले आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. भारताला थोर राजे-महाराजे, संत-महात्मे यांची परंपरा लाभलेली आहे. त्यांच्याविषयी साहित्याचे लेखन व्हायला हवे. भारताचा गौरवशाली इतिहास लहानांपासून मोठ्यांपर्यंत शिकवला गेला पाहिजे.

३. सर्वच स्तरांवर मातृभाषा मराठीचे महत्त्व बिंबवणे !

कानावर जे ऐकायला मिळते, तेच मूल बोलायला शिकते. त्यामुळे लहानपणापासूनच मातृभाषा मराठीचा संस्कार मनावर होण्यासाठी पालकांचे प्रबोधन करणे, मराठी शाळा-महाविद्यालये चालू करणे, मराठीविषयीच्या स्पर्धा घेऊन लोकांमध्ये मराठी भाषाभिमान जागृत करणे आवश्यक आहे. मराठीप्रेमींनो अन् साहित्यिकांनो, मराठी भाषेची दुरवस्था मराठी माणसासाठी लज्जास्पद आहे, याचे गांभीर्य लक्षात घ्या ! प्रश्‍न केवळ भाषेपुरता मर्यादित नसून मराठीला दूर लोटल्यामुळे मराठी माणसाची मराठीसमवेत मराठी संस्कृतीशी, पर्यायाने भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ तुटत चालली आहे. आज आपण कुठल्याही देशात गेलो, तरी तेथील स्थानिक लोक, तसेच मोठ्या पदांवरील व्यक्ती त्यांच्या मातृभाषेत अभिमानाने बोलतात. त्यांना याची लाज वाटत नाही. जपानसारख्या देशाने दुसर्‍या महायुद्धात मोठा विध्वंस झाल्यानंतर केलेली प्रगती ही मातृभाषेच्या जोरावरच  केलेली आहे. आज त्यांनी मातृभाषेलाही संगणकीय भाषेत आणले आहे. आजच्या विज्ञानयुगात मानवाने कितीही प्रगती केली, तरी माणुसकी जपून सर्वांना एकत्र आणण्याचे अन् संस्कृती टिकवून ठेवण्याचे कार्य मातृभाषेविना शक्य नाही. येत्या मराठी साहित्य संमेलनाच्या दृष्टीने याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करावा अन् मराठीला गतवैभव प्राप्त करून देण्यास आपापल्या परीने हातभार लावावा, हीच अपेक्षा !

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल (३१.१.२०२४)