आज चालू होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त…
२ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाचा उद्देश मराठी साहित्य वृद्धींगत व्हावे, मराठी भाषा संवर्धन करत तिची अस्मिता जोपासावी, मराठी भाषेवर होणार्या आघातांच्या विरोधात जनमत निर्माण करून चळवळ उभी करणे, मराठीजनांना सकस साहित्य आणि विचार मिळणे, असा असतो; मात्र सद्यःस्थितीत मराठीची सर्वच स्तरावर दुर्दशा होतांना दिसत आहे. ना कुठले दर्जेदार मराठी साहित्य निर्माण होत आहे ना साहित्यिकांमध्ये भर पडत आहे ! अजूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. मराठी शाळा बंद पडत आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र पोचलेला मराठी माणूस; पण ‘त्याची मराठीच्या संदर्भात काय स्थिती आहे’, ही विचार करण्यासारखी अन् खेदजनक गोष्ट आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सध्याची मराठी भाषेची दयनीय स्थिती आणि मराठी भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी मराठीप्रेमी अन् साहित्यिक यांनी करावयाचे प्रयत्न यांविषयी ‘एक मराठीप्रेमी’ म्हणून विचारमंथन करण्याचा प्रयत्न केला आहे.
१. मराठीची दुरवस्था
१ अ. बंद पडणार्या मराठी शाळा ! : आज मराठी शाळा अल्प पटसंख्येअभावी मोठ्या प्रमाणावर बंद पडत आहेत. शाळेत शिकवायला ना शिक्षक आहेत, ना शिकायला विद्यार्थी ! स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही पाश्चिमात्य शिक्षणप्रणालीमुळे आणि परकीय भाषा इंग्रजीच्या वाढलेल्या किंबहुना वाढवलेल्या महत्त्वामुळे आज मुलांना मराठी शाळेत घालण्यास पालकच सिद्ध होत नाहीत. मातृभाषा मराठीपेक्षा मुलांना इंग्रजी शाळेत किंवा कॉन्व्हेंट शाळेत घालणे पालकांना भूषणावह वाटते.
१ आ. मुलांवर लहानपणापासूनच इंग्रजीचा प्रभाव ! : मुलांचे शिक्षणच इंग्रजीतून झाल्याने त्यांना मराठीचे महत्त्व काय कळणार ? मग मातृभाषेविषयी अभिमान तर दूरचीच गोष्ट आहे. लहानपणी ‘मम्मी-पप्पा’ आणि शाळेत ‘मॅडम-सर’ असे म्हणणारे पोर जसे मोठे होत जाते, तसे ‘माय’मराठीसह स्वत:च्या आई-वडिलांपासूनही दूर जाते. इतका इंग्रजी भाषेचा अन् संस्कृतीचा प्रभाव त्याच्यावर पडतो.
१ इ. मराठीत बोलणे म्हणजे कमीपणाचे वाटणारी युवा पिढी ! : युवा पिढीला मराठी भाषेत बोलणे कमीपणाचे वाटते. मग ‘आपण चारचौघात मराठीत बोललो, तर आपली नाचक्की होईल’, या विचाराने जमत नसले, तरी बोलण्यात जाणूनबुजून ४ इंग्रजी शब्द घुसडवण्यासही मुले मागे-पुढे पहात नाही ! असे बोलणे म्हणजे ‘आपण आपल्या ‘स्टेट्स’ला साजेसे रहाणे’, असे त्यांना वाटते. याच मुलांना इयत्ता तिसरी-चौथीच्या मुलांच्या पाठ्यपुस्तकातील मराठीही नीट वाचता येत नाही. महाराष्ट्रात विविध संस्कृतीचे लोक रहातात. यात उत्तर भारतियांचे प्रमाण अधिक आहे. खाण्या-पिण्याची दुकाने यांपासून ते कपडे, दागिने, किराणामालाची, तसेच मिठाईची दुकाने प्रत्येकच ठिकाणी हिंदी भाषिक लोक अधिक प्रमाणात असतात; परंतु मराठीविषयी अभिमान नसल्याने अन् मराठी बोलण्याचा संस्कारच अल्प असल्याने काही वेळा समोर मराठी माणूस दिसूनही आपण हिंदीतूनच बोलतो. हिंदी बोलण्याविषयी आक्षेप नाही; पण मराठी माणसासमवेत तरी मराठीत बोला !
१ ई. शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘मराठी’ अनिवार्य करा ! : आज बहुतांश शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘मराठी’ हा पर्यायी विषय असतो. त्यामुळे मुले अर्धे मराठी आणि अर्धे इंग्रजी शिकतात. अपुरे शिक्षण घेतल्याने मुलांना नीट लिहिता, वाचता आणि बोलताही येत नाही. पाढेही इंग्रजीत शिकणार्या या मुलांना साधा गुणाकार-भागाकार, बेरीज-वजाबाकी नीट करता येत नाही. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य केली पाहिजे. इयत्ता १२ वी पर्यंत मराठी विषय ऐच्छिक न ठेवता तोही अनिवार्य केला पाहिजे.
१ उ. न्यायालयांचे कामकाज इंग्रजी भाषेतून (?) : आज बहुतांश ठिकाणी छोट्या न्यायालयांचे कामकाजही इंग्रजी भाषेत चालते. ‘जजसाहेब’, ‘ऑर्डर ऑर्डर’, ‘प्लीज प्रोसीड’, ‘ऑब्जेक्शन’, ‘युवर ऑनर’ हे शब्द मग ओघाने येतातच. कामकाज मराठी भाषेत होण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो. मराठीत कामकाज करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे, तरीही न्यायालयाचे कामकाज इंग्रजीतूनच केले जाते. ते मराठीतून कधी होणार ? हा खरा प्रश्न आहे.
१ ऊ. इंग्रजीच्या वाढत्या प्राबल्यामुळे मराठीची गळचेपी !
१. बहुतांश दुकानांवरील पाट्या इंग्रजी भाषेत असतात. पाट्या मराठी भाषेत कराव्यात; म्हणून आदेश द्यावा लागतो. आंदोलने करावी लागतात, तरीही पाट्या इंग्रजीतच असतात. मराठी भाषेविषयी प्रेम नसल्याने आणि कायद्याचा धाक नसल्याने कुणी कारवाई केली, तर ‘पाकिटे’ देऊन आपसांत ते प्रकरण मिटवले जाते.
२. सध्या आई-वडीलच मुलांशी इंग्रजी भाषेत बोलतात. त्याचे प्रमाण साधारणतः ८० टक्के इतके असते. इंग्रजीचा इतका संस्कार झाल्यामुळे पालकांनाच शुद्ध मराठी भाषेत बोलता येत नाही, तर ते मुलांना मराठी भाषा काय शिकवणार ?
३. रेल्वेस्थानके, रुग्णालये, अधिकोष, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, मॉल्स इत्यादी सार्वजनिक ठिकाणीही सर्रासपणे इंग्रजीचा वापर केला जातो. तेथे आवश्यक सूचना अथवा माहिती इंग्रजी किंवा हिंदी भाषेत लिहिलेली असते. सर्वसामान्य मराठी माणूस गावाकडील लोक यांना ते समजणे कठीण जाते. त्यामुळे त्यांना अशा ठिकाणी जाणेही नकोसे वाटते.
४. सामाजिक माध्यमांचा लोकांवर पुष्कळ लवकर आणि दूरगामी प्रभाव पडतो. सध्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून बातम्या देतांना, तसेच व्याख्याने, प्रवचने यांतूनही परकीय शब्दांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.
५. समाजातील आर्थिक स्थिती चांगली असणारी माणसे, चांगल्या दर्जाची नोकरी करणार्या व्यक्ती यांचे वागणे सर्वसामान्य मराठी माणसाला कमी लेखणारे अथवा त्यांचा अवमान करणारे असते. ‘बोलण्यात इंग्रजी आले, म्हणजे आपण आधुनिक युगात टिकू शकतो, ज्यांना इंग्रजी येत नाही, ते मागासलेले’, अशी समजूत होते. ‘अंगावर सूट-बूट अन् मराठीचा काथ्याकूट’ अशीच त्यांची स्थिती झाली आहे.
अशा प्रकारे मराठी भाषेचे महत्त्व न्यून केले जात आहे. परिणामस्वरूप सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात न्यूनगंड वाढत आहे.
१ ए. परकीय शब्दांचा सर्रासपणे वापर ! : आज शुद्ध मराठी भाषेत बोलणारी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत तरी माणसे सापडतील का ? हा प्रश्नच आहे. नवीन ठिकाणी जातांना वाटेत कुणाला पत्ता विचारल्यावर ‘पुढील सर्कलजवळून एक राईट घ्या, मग त्यापुढे लेफ्ट घ्या !’, अशा प्रकारचे संभाषण सहजतेने होते. याच व्यक्तीला ‘पुढील अमुक अमुक चौकातून उजवीकडे वळून मग पुढचा रस्ता पकडून डावीकडे जा !’, अशा प्रकारे सांगितल्यास त्याच्या चेहर्यावरचे हावभाव पहाण्यासारखे असतात ! आज परकीय भाषेच्या आक्रमणामुळे मराठीत अनेक परकीय शब्द घुसलेले आहेत. ‘२ परकीय शब्द बोलण्यात-लिखाणात आले, तर बिघडले कुठे ?’, अशी लोकांची मानसिकता आहे. यामुळेच आज मायमराठीचा श्वास गुदमरत आहे.
१ ऐ. परकियांचा इतिहास शिकवला जाणे लज्जास्पद ! : कुठल्याही राष्ट्राचा इतिहास हा राष्ट्रीय अस्मिता जागृत करणारा सांस्कृतिक आणि गौरवास्पद ठेवा असतो. स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतर आजही भारतियांचा इतिहास न शिकवता परकियांचा इतिहास शाळा-महाविद्यालयांतून शिकवला जातो. पहिले-दुसरे महायुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती शिकवली जाते. मोगलांचा इतिहास रंगवून रंगवून शिकवला जातो; परंतु ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष होऊन गेला, त्यांचा किंवा मराठ्यांचा इतिहास शिकवला जात नाही, हे दुर्दैव आहे.
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(३१.१.२०२४)
(क्रमश: उद्याच्या दैनिकात)