Supreme Court On Gyanvapi : व्यास तळघरातील पूजेच्या विरोधात उच्च न्यायालयात जा !

सर्वोच्च न्यायालयाचे मुसलमान पक्षाला निर्देश  !

नवी देहली – वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात हिंदु पक्षाला पूजा करण्याची वाराणसी जिल्हा न्यायालयाने अनुमती दिल्याच्या विरोधात मुसलमान पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाला या अनुमतीच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचा निर्देश दिला. यावर ६ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

मुसलमान पक्ष असणार्‍या अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने ही याचिका प्रविष्ट केली होती. यात म्हटले होते की, जिल्हा न्यायालयाच्या अनुमतीनंतर प्रशासनाने घाईघाईत संबंधित स्थळावर बंदोबस्त तैनात करून तेथील लोखंडी कुंपण काढून टाकले. पूजेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी जिल्हा न्यायालयाने एक आठवडा दिला असतांना, रातोरात घाईघाईने काम हाती घेण्याचे प्रशासनाला काही कारण नव्हते. मशीद व्यवस्थापन समितीला या आदेशाविरुद्ध कायदेशीर मार्गाचा अवलंब करता येऊ नये, यासाठी प्रशासन वादींशी संगनमताने करत असलेले प्रयत्न हेच या घाईचे कारण आहे, असा दावा केला होता.

सामान्य भाविकांसाठी तळघरात दर्शनाला अनुमती

न्यायालयाच्या आदेशानंतर ३१ जानेवारीच्या रात्रीच वाराणसीच्या जिल्हा प्रशासनाने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात हिंदु पक्षकारांना पूजा करण्याची व्यवस्था केली. आता सामान्य भाविकांनाही तळघरात जाऊन देवतांचे दर्शन घेण्याची व्यवस्था चालू केली आहे. यामुळे काशी विश्‍वनाथ मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक ज्ञानवापीच्या व्यास तळघरात जाऊनही देवतांचे दर्शन घेत आहेत.

शुक्रवारी दर्शन आणि नमाजपठण दोन्ही चालू

२ फेब्रुवारी या दिवशी शुक्रवार असल्याने मुसलमानांना नेहमीप्रमाणे नमाजपठणासाठी ज्ञानवापीच्या परिसरात अनुमती देण्यात आली होती. त्याच वेळेस येथील व्यास तळघरात हिंदूंना दर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. दोन्हीही गोष्टी समांतर करण्यात येत होत्या. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिंदूंना पूजा करण्याची अनुमती देण्यात आल्याने येथील मुसलमानांनी २ फेब्रुवारी या दिवशी त्यांची दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला.

व्यास तळघर नाही, तर ‘ज्ञान तालगृह’ !

ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्यास प्रारंभ झाल्यानंतर काशीतील संत समाजासह काशी विद्वत परिषदेच्या विद्वनांनीही पूजा केली. काशी विद्वत परिषदेने या तळघराला ‘ज्ञान तालगृह’ असे नवे नाव दिले. ‘ते तळघर नाही, आता ते ज्ञान तालगृह म्हणून ओळखले जाईल’, असे सांगितले. अखिल भारतीय संत समितीनेही याला मान्यता दिली.

संपादकीय भूमिका

ज्ञानवापी येथे पूर्वी हिंदु मंदिर होते आणि तेथे वर्ष १९९३ च्या पूर्वीपासून पूजा होत होती, हे जगजाहीर आहे. असे असतांनाही मुसलमान त्यांचा दावा सोडत नाहीत. यावरून त्यांना सर्वधर्मसमभाव दाखवायचा नाही, हे पुन्हा स्पष्ट होते, हे तथाकथित निधर्मीवाद्यांनी आणि पुरो(अधो)गाम्यांनी लक्षात घ्यावे !