माथाडी कामगार आणि व्यापारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समितीची स्थापना होणार !

नवी मुंबई, १ फेब्रुवारी (वार्ता.) – माथाडी कामगार आणि व्यापारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापारी अन् माथाडी बचाव कृती समितीची लवकरच स्थापना करण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवी मुंबईतील बाजारपेठांमधील माथाडी आणि व्यापारी वर्गाच्या विविध प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची माथाडी भवन येथे ही संदर्भात बैठक झाली.

पणन संचालनालयाने १६ जानेवारी या दिवशी काढलेले परिपत्रक रहित करणे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र वाढवणे, कोल्ड स्टोरेजमधील अनधिकृत व्यवसाय थांबवणे, माथाडी कामगारांच्या मुलांना कार्यालयीन सेवेत घेणे आदी गोष्टींसाठी ही समिती काम करील.