दूरचित्रवाणी आणि भ्रमणभाष !

प्रतिकात्मक छायाचित्र

सध्या बहुतेक सर्वच आई-वडिलांना आपल्या मुलांविषयी चिंता सतावते आणि त्यावरून ते आपल्या मुलांविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना दिसतात. अप्रसन्नता कसली ? तर मुले सांगितलेले ऐकत नाहीत, ती दिवसरात्र भ्रमणभाष वापरून त्यांचा वेळ वाया घालवतात. ‘भ्रमणभाष सतत वापरल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन वेळ वाया जातो’, हे समजावण्याचाही काही आई-वडील प्रयत्न करतात. त्यावर ‘त्यात काय झाले ?’ असा उलट प्रश्न मुले करतात. अशा वेळी ही परिस्थिती सुधारण्याचे दायित्व कोण घेणार ?

भ्रमणभाष किंवा दूरचित्रवाणी सतत पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. लवकर अंधत्व येऊ शकते आणि अकाली चष्माही लागतो. अर्धा घंटा भ्रमणभाष हाताळत राहिल्याने किंवा अधिक दूरचित्रवाणी पाहिल्याने मनावर नकारात्मकतेचे आवरण रहाते. काही सुचेनासे होते. डोके जड होते. चांगले विचार येणे बंद होते. नाविन्यपूर्ण कृती करण्याकडे कल रहात नाही. निरुत्साह येतो. मन कंटाळवाणे होते. आळस वाढतो. एका जागेवरून उठावेसे वाटत नाही. कुणी काही सांगितले, तर त्याकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही. कुणी काही सांगितले, तर चिडचिड होते. बहुमूल्य वेळ वाया जातो तो वेगळा. त्याचसमवेत मुले व्यसनाधीन होतात. अशक्तपणा वाढतो. व्यसनाधीन झाल्यामुळे अवेळी मृत्यू येऊ शकतो. घर उद्ध्वस्त होऊ शकते. अशामुळे समाजात सद्गुणी पिढी, सुसंस्कृत, निरोगी पिढी कशी निर्माण होईल ? थोडक्यात भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी यांचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर करण्यामुळे अशा प्रकारे सर्वांगीण हानी होते.

यावर उपाययोजना काढण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी, तसेच शासनाने लक्ष घातले पाहिजे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात ‘दूरचित्रवाणी आणि भ्रमणभाष यांचे दुष्परिणाम’ यांविषयी प्रबोधन करणे आवश्यक झाले आहे. अशा प्रकारचे शिक्षण दिल्याने समाज आणि देश यांचे भले होईल. पालकांनी यासंबंधी सरकारकडे निवेदन देऊन विद्यार्थ्यांनी मर्यादित भ्रमणभाष वापरण्यासंदर्भात प्रबोधन केले पाहिजे. पालकांनीही मुलांकडे लक्ष देऊन त्यांच्या भ्रमणभाष वापरण्याकडे लक्ष ठवले पाहिजे. असे केले, तर आजच्या युवा पिढीला शिक्षित करून अपेक्षित असे ध्येय आपण साध्य करू शकू. आवश्यक माहिती मिळवण्यासाठी भ्रमणभाषचा उपयोग करणे चुकीचे नाही; परंतु प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. तशीच मर्यादा आपण स्वतःला घालून घेणे आवश्यक आहे. ‘अती तेथे माती’, हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे. भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी यांचा गैर अन् अतीवापर यांमुळे हानी होते, हे मुलांच्या लक्षात आणून देण्यास पालक आणि शिक्षक यशस्वी ठरले, तर मुले स्वतःहूनच त्याचा अतीवापर टाळतील !

– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.