अयोध्या येथे श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असतांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील रजनी नगरकर यांना जाणवलेली सूत्रे

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे होणार्‍या श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. सगळे जगच त्या अलौकिक आणि ‘न भूतो न भविष्यति ।’ अशा सुमुहूर्ताकडे अतीव आतुरतेने डोळे लावून बसले होते. शब्दांच्या पलीकडे असलेल्या त्या स्थितीचे वर्णन मी कसे करावे ?

राम मंदिर (अयोध्या ) येथील श्री रामलला यांची मूर्ति

१. या अभूतपूर्व सोहळ्याचे सनातन संस्थेला आमंत्रण मिळालेले ऐकून पुष्कळ आनंद होणे

या अभूतपूर्व सोहळ्याचे सनातन संस्थेला मिळालेले आमंत्रण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची तेथील उपस्थिती पाहून मला पुष्कळ आनंद होत होता.

२. श्रीराम सर्व हिंदूंचे आराध्य दैवत असल्यामुळे सोहळ्याच्या वेळी सर्वच जण मनाने अयोध्येत पोचलेले असणे

रजनी नगरकर

या सोहळ्यासाठी सर्वसामान्य भक्तांच्या समवेत अनेक संतमहात्मे, अभिनेते, खेळाडू, संगीतकार, गायक, शास्त्रज्ञ, उद्योगपती अशा वलयांकित व्यक्ती उपस्थित होत्या. यातून ‘श्रीराम कुणा एकाचा नसून तो सर्वांचाच आहे’, असे मला जाणवले. सगळे वातावरण राममय झाले होते. तो कार्यक्रम पहाणारी जगातील प्रत्येक व्यक्ती स्थुलातून त्याच्या घरी किंवा गावात असली, ती मनाने केव्हाच अयोध्येला पोचली होती.

३. श्रीराममंदिराचे सात्त्विक, भक्तीमय आणि श्रीरामतत्त्वाने भारलेले वातावरण

श्रीराममंदिरात चालू असलेले रामाविषयीचे गायन, तेथील भक्तीमय वातावरण, अनेक संत आणि भक्त यांची उपस्थिती यांतून सर्वत्र सात्त्विकता अन् श्रीरामतत्त्व प्रक्षेपित होत होते. या सोहळ्यासाठी मंदिराचे केलेले सुशोभीकरण मंदिराच्या सात्त्विकतेत पुष्कळ भर घालत होते.

४. तन-मन पूर्ण शुद्ध होण्यासाठी ११ दिवसांचे अनुष्ठान करणारे आणि ‘सर्व भारतवासियांच्या वतीने श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे’, असा भाव असलेले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी !

ठरलेल्या वेळी श्रीरामाप्रती अपार भक्तीभाव असलेले भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीराममंदिरात आगमन झाले. त्यांच्या देहबोलीतून त्यांचा श्रीरामाविषयीचा अपार भाव दिसून येत होता. माननीय पंतप्रधान मोदी अत्यंत ध्येयनिष्ठ जाणवत होते. ते हातातील लाल वस्त्रावर श्री रामललाला अर्पण करायचे छत्र घेऊन एकाग्रतेने मंदिराकडे चालले होते. ते इतरत्र कुठेही न बघता ‘एखाद्या भक्ताने मंदिराकडे धाव घ्यावी’, तसे सरळ आणि निर्विचार मनाने मंदिराकडे जात आहेत’, असे मला जाणवले. त्यांनी ११ दिवसांचे केलेले अनुष्ठान आणि त्यांचा सात्त्विक पोशाख पाहून त्यांच्या मनात ‘या सोहळ्यासाठी देवाने अन् सर्व भारतवासियांनी मला निवडले आहे. त्यासाठी मला श्रीरामाच्या मंदिरात पूर्ण पवित्र आणि शुद्ध होऊन जायचे आहे’, असा भाव जाणवत होता.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामची प्राणप्रतिष्ठा करतांना (राम मंदिर,अयोध्या )

५. पूर्ण समरसतेने पूजाविधी करतांना अखंडपणे श्रीरामाचा नामजप करणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी !

या सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे लक्ष केवळ श्री रामललाची पूजा भावपूर्ण आणि शरणागतीने करण्याकडेच होते. ते पूर्ण समरस होऊन पूजाविधी करत होते. ‘प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विधी चालू असतांना मोदींचा रामाचा नामजप अविरत चालू होता. मधूनच ते भावपूर्णपणे श्री रामललाला न्याहाळत होते. ‘श्री रामललाला नमस्कार करतांना ते प्रार्थना करत होते’, असे मला वाटत होते.

६. पंतप्रधान मोदी यांचे वागणे आणि देहबोली यांतून राष्ट्र अन् जनता यांविषयी जाणवलेली संवेदनशीलता !

श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यावर मोदी गर्भगृहाच्या बाहेर आले, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर भारताविषयीचा प्रेमभाव, आदरभाव आणि जनतेप्रती त्यांच्या मनात असलेली संवेदनशीलता ओसंडून वहात होती. हा भाव लक्षात घेऊन सर्व हिंदूंनी भारतासाठी, म्हणजे येणार्‍या ‘हिंदु राष्ट्रा’साठी एकत्र येण्याची पुष्कळच आवश्यकता आहे. तसे झाले, तरच ‘हिंदु राष्ट्र’ येणार आहे.

७. भावपूर्ण पूजाविधी करण्याचे जाणवलेले महत्त्व !

पूजाविधीपूर्वी मला श्री रामललाच्या मूर्तीचे डोळे मारक वाटत होते. प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाल्यावर श्री रामललाच्या डोळ्यांतून सात्त्विकता, प्रेमभाव आणि आनंद यांची स्पंदने प्र्रक्षेपित होत होती. प्राणप्रतिष्ठेनंतर त्या मूर्तीत एकदम तेज येऊन सजीवता जाणवू लागली. यावरून पूजाविधीचे मंत्र, योग्य पुरोहित आणि भावपूर्ण पूजा करणारा यजमान यांचे महत्त्व माझ्या लक्षात आले. श्री रामललाच्या मूर्तीच्या चरणांतून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होतांना जाणवून प्रत्येक जण श्रीरामाच्या चरणी शरणागतभावाने नतमस्तक होऊन वंदन करत होता. सनातनचे साधक ‘आता ‘हिंदु राष्ट्र’ लवकर येऊ दे’, अशी प्रार्थना करत आहेत’, असे मला जाणवले.

८. ‘श्री रामलला स्वतःच्या हृदयात विराजमान आहे’, असे वाटणे

हा सोहळा माझ्या डोळ्यांसमोरून हलतच नाही. मी श्री रामललाला माझ्या हृदयात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मी माझ्या मनाला ‘ते राममंदिर अयोध्येतच नाही, तर ते माझ्या हृदयातही आहे’, अशी जाणीव करून देत होते. ‘श्री रामलला माझ्या हृदयात विराजमान आहे’, या भावाने माझे मन उचंबळून येत होते आणि त्याच्या चरणी नतमस्तक होत होते.

९. कृतज्ञता

‘गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कृपेने मला हे विचार लिहिता आले’, यासाठी त्यांच्या चरणी हे ४ शब्द अर्पण करून मी कृतज्ञता व्यक्त करते. हे गुरुमाऊली, इदं न मम । (हे लिखाण माझे नाही.)’

– रजनी नगरकर (वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, रामनथी, गोवा.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक