श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळा, लोटे आयोजित गो संमेलन
लोटे – संत आणि संत वाङ्मय समाजाला दिशा देणारे आहे; मात्र आज दिशादर्शक कोण आहेत? तर ज्यांची स्वतःची दिशा चुकली आहे, तेच दिशादर्शन करत आहेत, ही खरी शोकांतिका आहे, संत हेच समाजाचे खरे दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी ‘देव वसे चित्ती । त्याची घडावी संगती ।।’ या संत तुकोबारायांच्या चिंतनात्मक अभंगावर निरूपण करतांना केले, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळा लोटे आयोजित ३ दिवसांचे गो संमेलनाच्या सत्रात कीर्तनात ते बोलत होते. या संमेलनातील मार्गदर्शनाचा लाभ राज्यातील अनेक गोपालक आणि गोरक्षकानी घेतला.
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थानकडून ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
ह. भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ पुढे म्हणाले,
संत वाङ्मयावरील आघात थांबवण्यासाठी शक्ती पणाला लावली पाहिजे. मनुष्याला जीवनात सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी, यासाठी आपल्या जीवनात संत संगत मिळायला हवी. देवाजवळ काय मागावे ? हे कळायला हवे, अन्यथा मनुष्य मागतो आणि दुःखच वाढते, जीवनातील दुःख दूर होईल असे मागावे. जे प्रभुचे चिंतन करतात त्यांच्या देहात देव असतो, ज्याच्या चित्तात परमात्म्याचे वास्तव्य आहे , ज्याच्या जीवनातील द्वंद गेले ते संत, असे जे संत आहेत त्यांची जीवनात संगती घडावी, संतांच्या संगतीने जीवन कृतार्थ होते.
गोरक्षण आणि गोपालन हे अवघड काम संमेलनाचे मुख्य संयोजक ह.भ.प. भगवान कोकरे महाराज करत असल्याविषयी त्यांचे कौतुक ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले. या वेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर, कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, रायगड; ह.भ.प. धर्मश्री शेवाळे, ह.भ.प. शैलेश महाराज आंब्रे, ह.भ.प. उत्तम मोरे, ह.भ.प. प्रमोद राणे, उद्योजक विश्वास कदम, हिंदु जनजागृती समितीचे श्री सुरेश शिंदे, सनातन संस्थेचे श्री. केशव अष्टेकर यांच्यासह गोसेवक, वारकरी उपस्थित होते, तसेच संमेलनाला अनेक राजकीय, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी भेट दिली.
गोशाळेचे अध्यक्ष संजय पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश चाळके, श्री. जितेंद्र आंब्रे , श्री. सुरेश बुवा काते, सौ. जयश्री कोकरे यांच्यासह गोसेवक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
आपला देश विश्वगुरु बनेल, असा आशावाद निर्माण झाला !- ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळअयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातील अनुभव सांगतांना ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले, ‘‘देशाचा राजा धर्म-संस्कृतीला पूरक हवा’, असे आपले धर्मग्रंथ सांगतात. या प्रमाणेच साधना ११ दिवस अनुष्ठान पंतप्रधान मोदी यांनी केले. ते जेव्हा प्राणप्रतिष्ठेला मंदिरात जात होते, तेव्हा त्यांच्यातून तेज बाहेर पडत असल्याचे जाणवत होते. वेगळा आनंद अंतरंगात उमटत होता. मोदींनी भजनात टाळही वाजवले. त्यामुळे आपला देश विश्वगुरु बनेल, असा आशावाद निर्माण झाला.’’ |