अष्टावक्र गीतेचे रचयिते ऋषि अष्टावक्र !

 भारतातील महान ऋषि परंपरा (लेखांक १५)

१. ऋषि अष्टावक्रांची विद्वत्ता

‘राजा जनकाने, एका महायज्ञाचे आयोजन केले होते. अनेक विद्वान आणि ऋषि या यज्ञात सहभागी झाले होते. शरिराने वाकडा असलेला एक तरुण त्या यज्ञमंडपात प्रवेश करू लागला. द्वारपालाने त्या विचित्र व्यक्तीला पाहून तिला हटकले आणि यज्ञमंडपात जाण्यास मनाई केली. द्वारपाल त्याला म्हणाला, ‘‘इथे केवळ ज्ञानी, ज्येष्ठ आणि अधिकारी लोकांनाच प्रवेश आहे.’’ त्यावर तो तरुण म्हणाला, ‘‘ज्ञान हे वयावर किंवा बाह्य रूपावर अवलंबून नसते. तू मला आत जाऊ दिलेस, तर श्रेष्ठ विद्वानांनाही मी पराभूत केल्याचे पहाशील.’’ हा संवाद तेथून जाणार्‍या राजा जनकाने ऐकला. वाकडे-तिकडे शरीर असूनही त्या तरुणाच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास पाहून राजा म्हणाला, ‘‘तू ज्ञानी आहेस, तर माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. झोपल्यावर डोळे कोण मिटत नाही ? जन्म घेतल्यावर कोण हलत नाही ? आणि कुणाला हृदय नसते ?’’

प्रश्न संपताच तात्काळ त्या तरुणाचे उत्तर आले, ‘‘महाराज मासा झोपल्यावरही डोळे मिटत नाही. जन्मल्यावर अंडे हलत नाही आणि दगडाला हृदय नसते.’’ ही उत्तरे ऐकून जनक राजाने आणखी प्रश्न विचारले. राजा प्रश्न विचारत गेला आणि तरुण उत्तरे देत गेला. या उत्तरांनी समाधान पावलेल्या राजा जनकाने आदरपूर्वक त्या तरुणाला यज्ञसभेत नेण्याचा आदेश दिला.

 २. ऋषि अष्टावक्रांचा राजा जनकाच्या यज्ञसभेत येण्यामागील हेतू

कोण होता तो तरुण ? तो होता अष्टावक्र ! कहोड ऋषि आणि महर्षि उद्दालकांची कन्या सुजाता यांचा हा पुत्र ! आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करून मान सन्मान मिळवावा, या उद्देशाने अष्टावक्र राजा जनकाच्या यज्ञ सभेत आला नव्हता. त्याची इच्छा होती, ती बन्दी या अहंकारी विद्वानाला पराभूत करायची ! बन्दीने राजा जनकाच्या दरबारात अष्टावक्राचे वडील महर्षि कहोड यांना पराभूत करून त्यांना मृत्यूच्या तोंडी धाडले होते. बन्दीने इतरही अनेक विद्वानांना शास्त्रार्थात पराभूत करून ठरलेल्या अटीप्रमाणे पाण्यात बुडून मृत्यूमुखी पाठवले होते. अशा अहंकारी बन्दीला पराभूत करून दंड द्यायचा, ही तीव्र इच्छा अष्टावक्राच्या मनात होती.

३. ऋषि अष्टावक्र यांचा जन्म

अष्टावक्र बालपणापासूनच जिज्ञासू आणि अभ्यासक होता. त्याने सातत्याने कष्ट करून ज्ञानसंपादन केले. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर त्याला वडिलांवर झालेल्या अन्यायाची माहिती मिळाली, तसेच स्वतःच्या जन्माचे सत्यही कळाले. त्याचे वडील महर्षि कहोड एकदा शिष्यांना शिकवत होते. त्या वेळी त्यांची गर्भवती पत्नी सुजाता तेथे होती. वडिलांचा स्वाध्याय ऐकून गर्भातले बाळ म्हणाले, ‘‘पिताश्री, आपले वेद पठणाचे उच्चारण शुद्ध नाही.’’ हे ऐकून अपमानित झालेल्या वडिलांनी गर्भातल्या बाळाला शाप दिला,‘‘८ ठिकाणी वाकडे असलेले शरीर घेऊन तू जन्माला येशील.’’ आपले शरीर वाकडे का झाले ? ही गोष्ट कळताच एखादा मुलगा वडिलांवर रागावला असता; पण ज्ञानगंभीर अष्टावक्राला मात्र या प्रसंगातली स्वतःची चूक समजली. त्याने मनोमन आपल्या पित्याची क्षमा मागितली आणि स्वतःच्या महान पित्यावर झालेल्या अन्यायाचा शोध घेण्याचे त्याने ठरवले. याच हेतूने तो जनकाच्या यज्ञसभेत आला होता.

 ४. अष्टावक्रांची पित्याशी भेट आणि शापातून मुक्तता

राजा जनकाच्या यज्ञसभेत बन्दीशी त्याचा विविध विषयांवर वादविवाद झाला. राजा जनकासमोर अष्टावक्राने बन्दीला पूर्ण पराभूत केले. तो राजाला म्हणाला, ‘‘अनेक विद्धानांना पाण्यात बुडवून मारणार्‍या या बन्दीला तशीच शिक्षा झाली पाहिजे. ’’ यावर बन्दी म्हणाला, ‘‘पाण्यात बुडण्याचे निमित्त करून या सर्व विद्वानांना मी वरूण लोकात यज्ञासाठी पाठवले आहे. १२ वर्षांचा यज्ञ पूर्ण करून हे सर्व विद्वान आता भूतलावर येतील.’’

बन्दीने कथन केल्याप्रमाणे सर्व विद्वान आले. आपले वडील महर्षि कहोड यांना पाहून अष्टावक्राला अत्यानंद झाला. पित्याच्या चरणी नतमस्तक झालेल्या त्या पुत्राला आशीर्वाद देत कहोड म्हणाले, ‘‘मुला, समंग नदीत तू स्नान कर.’’ अष्टावक्राने नदीत स्नान केले आणि गर्भावस्थेत मिळालेल्या वडिलांच्या शापातून तो मुक्त झाला. त्याच्या शरिराचा वक्रपणा नाहीसा झाला. जन्मतः वक्र असलेल्या शरिरामुळे अष्टावक्र निराश झाला नाही.

वडिलांच्या शापामुळे त्यांच्यावर न रागावता त्यांच्याविषयी आदरभावनेने वागून तो आदर्श पुत्र ठरला. चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळून त्याच्या शरिराचा वाकडेपणाही गेला. अष्टावक्राची ही कथा, आजही प्रयत्नदिशा देणारी आहे. ज्ञान, कष्ट, जिद्द आणि नम्रता अशा गुणांनी परिस्थितीवर मात करून संपन्न जीवन मिळवता येते, हे अष्टावक्राने दाखवून दिले.

५. अष्टावक्रांच्या संयमाची परीक्षा आणि विवाहांसंबंधी तत्त्वज्ञानाचे प्राकट्य

मोहाच्या प्रसंगातही पाय घसरू न देता संयमपूर्ण वर्तनान माणूस योग्य ते सुख मिळवू शकतो, हा संदेश देणारा एक प्रसंग अष्टवक्राच्या आयुष्यात आला. सुप्रभा या सुंदर आणि गुणी मुलीला त्याने पाहिले. ती वदान्य ऋषींची कन्या होती. तिच्याशी विवाह करण्याची इच्छा अष्टावक्राने व्यक्त केली. तेव्हा प्रथम याची परीक्षा घ्यायची, असे ऋषींनी ठरवले. ऋषींच्या आश्रमाच्या दिक्देवतेने सौंदर्यवतीचे रूप घेऊन त्याला भुरळ घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संयमी अष्टावक्राने तिला अयोग्य वागण्यापासून निवृत्त होण्याचा उपदेश केला. त्याक्षणी दिक्देवता प्रसन्न होऊन प्रकटली. घेतलेल्या परीक्षेत अष्टावक्र उत्तीर्ण झाल्याचे सांगून त्याला आशीर्वाद देऊन ती अंतर्धान पावली. अष्टावक्र आणि दिक्देवतेच्या संवादामध्ये विवाहांसंबंधी तत्त्वज्ञानाचा ऊहापोह आढळतो.

अष्टावक्राला प्राचीन काळातील एका महान ऋषींचा दर्जा मिळाला. त्याने राजा जनकाला सांगितले तत्त्वज्ञान आणि अष्टावक्र गीता या नावाने ग्रंथबद्ध झालेले आढळते. ‘अष्टावक्र संहिता’ हा त्याचा ग्रंथही प्रसिद्ध आहे. अष्टावक्राने सांगितलेले चक्रतीर्थ माहात्म्य स्कंद पुराणात ग्रंथित केले आहे.’

– स्वाती आलूरकर (साभार : मासिक ‘मनशक्ती’, फेब्रुवारी २००७)