अमेरिकेत मराठी शाळा चालू; पण महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होणे खेदजनक ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

नवी मुंबई, २८ जानेवारी (वार्ता.) – आपण सध्या मराठी भाषेकडे दुर्लक्ष करत आहोत. अमेरिकेत १०० हून अधिक मराठी शाळा चालू होत असतांना महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होत आहेत, याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाशी येथे एका कार्यक्रमात खेद व्यक्त केला. शासनाच्या वतीने आयोजित ‘विश्व मराठी संमेलन २०२४’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपिठावर मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, मी मराठीसाठी कारागृहात गेलो आहे. मी कडवट मराठी आहे. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही. हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नाही; कारण देशाची राष्ट्रभाषा अद्याप निश्चित झालेली नाही. आपल्याकडील शाळांमध्ये जर्मन, फ्रेंच आदी भाषा शिकवल्या जातात, तशा स्थानिक भाषा शिकवणेही आवश्यक आहे. यासाठी ‘राज्य सरकारने सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी.’ मराठी माणसाला मुंबईत जैन सोसायटीत घर घेऊ दिले जात नाही. हे अन्य राज्यात करून दाखवा. आमच्या बोटचेपे धोरणामुळे येथे असे होते. मराठीत जो विनोद होतो, तो कुठल्याही भाषेत होऊ शकत नाही. मराठी बोलण्याला संकुचित वाटू देऊ नका. मराठी बोलण्याने तुम्हाला अभिमान वाटायला हवा. कुणीही भेटले, तरी तुम्ही मराठीतच बोला.

दीपक केसरकर म्हणाले की, या वर्षीपासून सर्व भाषिक शाळांना मराठी विषय सक्तीचा केला आहे. तरुणांमध्ये मराठी भाषा टिकून रहावी, त्यांना आवड वाटावी, यासाठी ‘मराठी युवक मंडळ’ स्थापन केले आहे. मराठी भवन बांधण्याचा २४९ कोटींचा प्रकल्प आहे. यासाठी शिक्षण विभागाची जागा दिली आहे. सर्व मराठी संस्था मुंबईत रहातील, मराठी भाषा विभाग कार्यरत राहील. काशीला होणार्‍या संमेलनासाठी निधी देणार असून राज्यातील ६ विभागांत मराठी भाषा संमेलन घेणार आहे. पुढे प्रत्येक जिल्ह्यात संमेलन घेणार आहे. संत साहित्य संमेलनाला निधी कायम दिला जाईल. वाई येथे मराठी विश्वकोश मंडळाची इमारत बांधण्यात येणार आहे. या वर्षीपासून विदेशात होणार्‍या मराठी भाषा संमेलनासाठी निधीचे प्रावधान करण्यात येणार आहे.’’

संपादकीय भूमिका :

शिक्षण विभागाला याविषयी काय म्हणायचे आहे ?