Maldives India Crisis : मालदीवकडून भारतासमवेतचे देवाण-घेवाणीचे सर्व कार्यक्रम रहित !

मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

माले (मालदीव) – चीनचे समर्थन करणार्‍या मालदीव सरकारने भारतासमवेतचे सर्व देवाण-घेवाणीचे (‘एक्सचेंज’चे) कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि मालदीव यांच्यात सैनिकी, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक आणि सागरी संशोधन यांच्याशी संबंधित देवाण-घेवाण कार्यक्रम चालवले जात आहेत. राष्ट्रपती मोइज्जू यांच्या चीन भेटीनंतर मालदीव सरकारने भारतासमवेतचे हे कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती मोइज्जू यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत १० हून अधिक करार केले आहेत.

मध्यंतरी मालदीवचे मंत्री आणि नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अश्‍लाघ्य टीका केल्याने भारतीय नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. याचा परिपाक म्हणजे मालदीवला जाणार्‍या भारतीय पर्यटकांच्या संख्येत ५६ टक्क्यांची घसरण झाली. जानेवारी २०२३ मध्ये १८ सहस्र ६१२ भारतीय पर्यटक मालदीवला गेले होते. जानेवारी २०२४ मध्ये आतापर्यंतची हीच संख्या केवळ ८ सहस्र ११० आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतद्वेष्ट्या चीनची बाजू घेऊन राष्ट्रपती महंमद मोइज्जू त्यांच्या देशाला संकटाच्या खाईत लोटत आहेत. मालदीवचा याद्वारे आत्मघात होणार आहे, हे येणारा काळ त्यांना दाखवून देणार, यात शंका नाही !