कुठलाही मोठा सोहळा सुरक्षितपणे पार पाडण्यात पोलिसांची महत्त्वाची भूमिका असते. अशा सोहळ्यांत पोलिसांचे भाविकांशी उद्धट वर्तन, अरेरावीची भाषा, भाविकांना मारहाण, काही प्रसंगी लाठीमार करणे, असे अपप्रकार घडत असल्याचे आपण सर्वांनीच कधी ना कधी अनुभवलेही असेल. याला अपवाद ठरला तो २२ जानेवारीला झालेला अयोध्येतील ऐतिहासिक रामोत्सव ! रामोत्सवात अर्थात् श्री रामललाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आरंभीपासूनच उत्तरप्रदेश पोलिसांचे भाविकांशी अत्यंत चांगले वर्तन होते. हे पाहून माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना !
१. सुरक्षायंत्रणांसमोर सोहळा निर्विघ्नपणे पाडण्याचे मोठे आव्हान !
हिंदूंच्या कुठल्याही सोहळ्याला धर्मांधांकडून धोका असतोच. त्यात हा सोहळा अयोध्येतील श्रीराममंदिराचा होता. त्यामुळे याही सोहळ्याला जिहादी आतंकवाद्यांकडून सर्वांत मोठा धोका होता. या सोहळ्याच्या काही दिवस आधी अयोध्येत ३ जणांना घातपात घडवून आणण्याच्या कटाखाली अटकही करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आणि एकूणच जगभरातील भाविकांची प्रचंड गर्दी, या पार्श्वभूमीवर राज्य अन् केंद्र स्तरांवरील सर्व प्रकारच्या सुरक्षायंत्रणांना पाचारण करण्यात आले होते. या सर्वांसमोर अयोध्येतील ऐतिहासिक सोहळा निर्विघ्नपणे पाडण्याचे मोठे आव्हान होते.
२. संयमाने कर्तव्य बजावणे !
अयोध्येत येणारे भाविक विविध प्रकृतींचे होते. जवळपास सर्वच भाविक नेहमीप्रमाणे पोलिसांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत होते; परंतु त्याला काही अपवादही होते. काही भाविक पोलिसांशी वाद घालतांना दिसत होते. काही जण अगदी दात-ओठ खाऊन पोलिसांशी बोलत होते; परंतु तरीही पोलीस मात्र त्यांच्याशी अत्यंत संयमाने बोलत होते. एवढ्या गर्दीतही शक्य तेवढे ते सर्वांना समजावून सांगत होते. पोलिसांचा हा संयम अविश्वसनीय होता.
३. तणावाच्या प्रसंगी वातावरण हलके-फुलके ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न !
या सोहळ्याची सुरक्षाव्यवस्थाच जणू अत्यंत वेगळ्या कार्यशैलीने हाताळली. एरव्ही भाविकांनी केलेली वादावादी, त्याला पोलिसांकडून देण्यात येणारे प्रत्युत्तर, जमावाचा दबाव आदींमुळे वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनते. तणावाचे असे प्रसंग अयोध्येत पावलोपावली घडत होते; परंतु अशा प्रसंगांत एरव्ही उर्मटपणे बोलणारे पोलीस अयोध्येतील गर्दीत घडणार्या अशा प्रसंगांत मात्र काहीतरी विनोदात्मक बोलून वातावरण हलके-फुलके ठेवण्याचा प्रयत्न करत होते. भाविकांचा संताप आणखी वाढू न देण्याची पुरेपूर काळजी पोलीस घेत होते. त्यामुळे भाविक लगेचच नरमाईचे धोरण स्वीकारून पोलिसांना सहकार्य करत होते. पोलिसांकडे समयसूचकता साधणारी उत्तम विनोदबुद्धीही असते, हे पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला ! अर्थात् काही तुरळक ठिकाणी पोलीस आणि भाविक यांच्यात वादावादी होऊन तणाव निर्माण झालाही; पण पोलिसांचा संयम सुटला, असे अभावानेच घडले. काही ठिकाणी ‘पोलिसी खाक्या’ दाखवणेही आवश्यक असते. तथापि कुठे परिस्थिती हाताबाहेर गेली, अशा एकाही घटनेची आतापर्यत नोंद नाही. त्यामुळे कुठल्याही संघर्षाविना पार पडलेला हा बहुधा एकमेवाद्वितीय आणि अवर्णनीय सोहळा असावा.
४. उत्तम कर्तव्यदक्षता !
पोलीस जरी असे विनोद करत असले किंवा वातावरण हलके-फुलके ठेवत असले, तरी कर्तव्यात मात्र ते चोख होते. भाविकांनी कितीही विनवण्या केल्या, एखाद्याने राजकीय व्यक्तींना भ्रमणभाष लावून दिला किंवा कितीही आक्रस्ताळेपणा केला, तरी त्यासमोर पोलीस झुकत नव्हते. ‘अमुक कुठल्या ठिकाणावरून कुणालाही आत सोडायचे नाही म्हणजे नाही’, या आदेशाचे त्यांनी संपूर्ण सोहळ्यात तंतोतंत पालन केले.
५. उत्तरप्रदेश पोलिसांच्या कार्यशैलीची पंचसूत्री !
अयोध्येच्या सुरक्षेचे दायित्व पार पाडणे, हे अजिबात सोपे काम नव्हते. केव्हाही काहीही घडू शकते, अशा वातावरणात पोलिसांनी पुढील पंचसूत्री वापरली –
अ. डोके थंड ठेवणे
आ. सौजन्य दाखवणे
इ. संघर्ष निर्माण होऊ न देणे
ई. प्रसंगी आवश्यक तेवढा पोलिसी खाक्या दाखवणे
उ. गोड बोलून स्वतःचे ईप्सित साध्य करणे
या पंचसूत्रीच्या आधारे पोलिसांनी या सोहळ्याच्या सुरक्षेचे दायित्व यशस्वीपणे पार पाडले, असे लक्षात आले.
६. सुरक्षाव्यवस्थेचा ‘उत्तरप्रदेश पॅटर्न’ सर्वत्र राबवा !
मोठमोठ्या सोहळ्यात नागरिक आणि पोलीस यांच्यातील संघर्षातून वातावरण बिघडते, त्यातून काहीही निष्पन्न होत नाही, उलट पोलिसांविषयी जनतेच्या मनात आणखी पूर्वग्रह निर्माण होतात. त्यामुळे अयोध्येतील सुरक्षाव्यवस्था पाहिल्यावर असा प्रश्न पडतो की, असा मार्ग सर्वत्रचे पोलीस का अवलंबवत नाहीत ? असे जर केले, तर पोलिसांचाच ताण हलका तर होईलच; पण ‘पोलिसांशी मैत्रीही वाईट आणि शत्रूत्वही वाईट’, असे जे म्हटले जाते, त्याला आपोआपच कृतीतून उत्तर मिळेल. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेचा हा ‘उत्तरप्रदेश पॅटर्न’ सिद्ध होऊन तो देशभर राबवला जावा. एकूणच या संपूर्ण सोहळ्यात स्वतःच्या राज्याचे नाव सार्थकी लावत उत्तरप्रदेश पोलिसांनी प्रश्न निर्माणच होऊ दिले नाहीत. त्यांच्याकडे होते केवळ ‘उत्तर !’
– श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’