समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी । चौथा अत्यंत साक्षेप ।’ या महत्त्वाच्या चतुःसूत्रीत सामाजिक आणि राजकीय तत्त्वचिंतन आढळते.
१. हरिकथानिरूपण
पाकिस्तानचे राष्ट्रीयत्व इस्लाममध्ये साठवलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीयत्व भांडवलवादी कडव्या स्वातंत्र्यामध्ये आहे. जपानचे राष्ट्रीयत्व उद्यमशीलतेत आहे, तर भारताचे राष्ट्रीयत्व वैदिक संस्कृतीमध्येच आहे. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।’ समर्थांच्या या शिकवणीनुसार कोणतेही संघटनात्मक कार्य यशस्वी होण्यासाठी हरिभक्तीचा आधार आवश्यक आहे. अध्यात्मामधील विवेक आणि वैराग्य या दोन्हींच्या आधारावर केलेले राजकारण कधीच स्वार्थी, ढोंगी, भंपक अन् समाजविघातक होत नाही.
२. राजकारण
राजकारणाचा मुख्य संबंध शासनाद्वारे देशाची सर्वांगीण प्रगती साधणे आणि तो वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवणे याच्याशी असतो; परंतु दुर्दैवाने आजचे राजकारण म्हणजे गटबाजी, कटकारस्थाने, फसवणूक, भ्रष्टाचार ही गुंतवणूक समजून अन् सख्यासोयरांचे उत्थापन करून विरोधकांना नामशेष करण्याचे साधन बनले आहे. याबाबतीत समर्थांनी भगवान श्रीकृष्णाची नीती अंगीकारली आहे. ‘राजकारण’ या शब्दासह धर्म, संस्कृती, शिक्षण इत्यादी क्षेत्रे भ्रष्ट झाली आहेत.
३. सावधपण । सर्वविषयी ।।
व्यक्तीगत अन् राष्ट्रीय अस्मिता यांविषयी असलेला भारतियांचा बेफिकीरपणा अन् भोंगळपणा जगात कुठेही आढळत नाही. स्वातंत्रदिनापासून भारत राष्ट्रहितासाठी सावध राहिला असता, तर चीन, पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या शत्रूराष्ट्रांनी जे लचके तोडले, ते तोडले नसते. बेसावधपणाच्या धोरणामुळे तिबेट चीनच्या घशात गेला आहे अन् नेपाळही त्याच उंबरठ्यावर आहे.
४. अत्यंत साक्षेप ।
अंगीकृत कार्यामध्ये अंगचोरपणा न करता अखंड प्रयत्न करणे हा समर्थांचा आग्रह असे, तर आळसाला ते मोठा शत्रू मानत.
या चतुःसूत्रीचा अंगकार भारताने केल्यास अनेक समस्यांचे निराकरण होईल. आजही राजनीती अन् लोकशाही मोठ्या दुष्टचक्रात फिरत आहे. तिला बाहेर काढण्यास बहुसंख्य समाजाने समर्थांच्या तत्त्वचिंतनाचा अंगीकार करून ती अमलात आणली पाहिजे. समर्थांचे विचारधन हीच खरी समाजोत्थान आणि राष्ट्रनिर्मिती यांची ऊर्जा आहे.
या प्रजासत्ताक लोकशाहीच्या दुष्टचक्रातून समाजाला बाहेर काढून राष्ट्राला वैभवशाली आणि बलसंपन्न करण्याचा मार्ग अन् दिशादर्शन हे समर्थ श्री रामदासस्वामींच्या सामाजिक अन् राजकीय तत्त्वचिंतनात आढळते. सागरी चक्रीवादळात सापडलेल्या समाजनौकेला श्री समर्थांचे चरित्र, कार्य आणि साहित्यच दीपस्तंभाप्रमाणे आजही खचित मार्गदर्शक ठरेल. हा ज्ञानसूर्य उगवण्याचा काळ समीप आला आहे; पण त्यासाठी ‘वन्ही तो चेतवावारे चेतविताची चेततो । केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे ।’ या उक्तीची मशाल घेऊन समस्त समाजाने वाटचाल केली पाहिजे.’
– अधिवक्ता यशवंत फडणीस (साभार : मासिक ‘प्रसाद’)