रत्नागिरी – प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २५जानेवारी ते ८ फेब्रवारीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्याविषयीचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.
सामाजिक माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्या जात आहेत. त्यामुळे राज्यासह जिल्ह्या-जिल्ह्यात तणावचे वातावरण निर्माण होत आहे. या घटनांचा पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातही उमटू शकतील, अशी शक्यता पोलीस प्रशासनास वाटू लागल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला.
या पत्रव्यवहारानुसार जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी जिल्ह्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने रत्नागिरी ८ फेब्रुवारीपर्यंत कालावधीत मनाई आदेश लागू केला आहे. या कालावधीत व्यक्ती, संस्था, संघटना यांनी आंदोलनासारखे प्रकार करू नयेत.