सर्वांशी प्रेमाने वागणारे आणि संतांप्रती श्रद्धा असलेले सांगली येथील कै. नागेश विश्वनाथ पुराणिक (वय ६८ वर्षे) !

६.१.२०२३ या दिवशी (पौष शुक्ल पौर्णिमा/शांकभरी पौर्णिमा) सांगली येथील श्री. नागेश विश्वनाथ पुराणिक यांना देवाज्ञा झाली. २५.१.२०२४ (पौष शुक्ल पौर्णिमा/शांकभरी पौर्णिमा) या दिवशी कै. नागेश विश्वनाथ पुराणिक यांचे वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. नागेश विश्वनाथ पुराणिक

१. श्रीमती हेमांगी पुराणिक (पत्नी) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६५ वर्षे), सांगली.

श्रीमती हेमांगी पुराणिक

१ अ. मनमोकळा आणि आनंदी : ‘यजमानांचा स्वभाव मनमोकळा आणि आनंदी होता. ते मलाही आनंदी रहायला सांगत.

१ आ. निष्ठेने आणि उत्साहाने व्यवसाय करणे : ते दुकानातील काम पूर्ण निष्ठेने करायचे. व्यवसाय असल्याने यजमानांच्या जेवणाच्या वेळा नेहमीच मागे-पुढे व्हायच्या, तरीही यजमान सर्व उत्साहाने आणि आनंदाने करत असत.

 

१ इ. मनात अन्यांविषयी प्रतिक्रिया नसणे आणि मनात विचारही अत्यल्प असणे : आमचे लग्न झाल्यानंतर कुणाच्या वागण्याने माझे मन दुखावल्याचे मी त्यांना सांगितले, तर ते मला त्याकडे दुर्लक्ष करायला सांगत असत. ते कुठल्याही प्रसंगाचा किंवा समोरच्याच्या वागण्याचा फार विचार करत नसत. तो विषय तेथेच सोडून ते आपल्या कामात मग्न होत असत. त्यांच्या मनात अन्यांविषयी प्रतिक्रिया नसत. त्यामुळे त्यांच्या मनात विचारांचे प्रमाण अत्यल्प असे.

१ इ. मुलांची काळजी न करणे : मी मुलांची कधी काळजी केल्यास ते मला निश्चिंत रहायला सांगत. ते म्हणायचे, ‘‘मुले योग्य ते करतील. आता त्यांचे त्यांना कळते.’’

१ उ. नामजप करायची गोडी लागणे : अलीकडे यजमानांनाही नामजप करायची गोडी लागली होती. कोरोना महामारीच्या काळात आम्ही प्रतिदिन एकत्र नामजप करत होतो. कधी सामूहिक नामजप किंवा काही विशिष्ट कालावधीसाठी करायचे नामजप आल्यास यजमानही माझ्या समवेत नामजपाला बसायचे. आम्ही दोघे मिळून नामजप करायचो.

२. श्री. गौरीश पुराणिक (मुलगा), पुणे.

श्री. गौरीश पुराणिक

२ अ. अन्नाविषयी असलेला कृतज्ञताभाव : ‘बाबांचा जेवण्याखाण्यात ‘हेच हवे, तेच हवे’, असा आग्रह कधीच नसायचा. पानात वाढलेल्या अन्नाला ते कधीच नावे ठेवत नसत. ते म्हणत, ‘‘अन्नाचा अपमान करू नये. ताटात वाढलेले सर्व संपवले पाहिजे.’’

२ आ. मुलाला घरचा व्यवसाय करण्याविषयी आग्रह न करता, त्याच्या आवडीचे काम करण्याची मुभा देणे : घरचा फळ व्यवसाय पुष्कळ मोठा असूनही मी सनदी लेखापाल (सी.ए.) होण्याची इच्छा बाबांकडे व्यक्त केल्यावर त्यांनी मला सहजतेने होकार दिला. त्यांनी कधीच मला ‘घरच्या व्यवसायांत मी लक्ष द्यायला हवे किंवा मी तेच करायला हवे’, असा आग्रह केला नाही. ते प्रत्येक गोष्टीसाठी मला पुष्कळ प्रोत्साहन द्यायचे. मी सनदी लेखापालाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरही बाबांना पुष्कळ आनंद झाला होता. चांगल्या गोष्टींचे, मेहनतीचे त्यांना नेहमी कौतुक वाटत असे.

२ इ. गणपतीवरील श्रद्धा : बाबांची सांगलीचे ग्रामदैवत श्री सिद्धीविनायकावर पुष्कळ श्रद्धा होती. सकाळी दुकानात जाण्यापूर्वी ते सिद्धीविनायकाला नमस्कार करूनच कामाचा आरंभ करत असत. बाहेरगावी जाण्याआधीही ते सिद्धीविनायकाला नमस्कार करून जात असत. शेवटपर्यंत ते संकष्टी चतुर्थीचा उपवास करत होते.’

३. सौ. इंद्राणी कुलकर्णी (मुलगी), पुणे.

३ अ. वडिलांचे बालपण : ‘वर्ष १९३५ मध्ये माझे आजोबा कै. विश्वनाथ वासुदेव पुराणिक यांनी सांगली (महाराष्ट्र) येथे फळांचे दुकान चालू केले. आरंभी वडिलांच्या लहानपणी घरची परिस्थिती बेताची होती.

३ आ. साधी रहाणी : माझ्या वडिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी दुकानात फळांच्या समवेत सुकामेवा आणि भाजीपाल्याच्या बियाण्यांची विक्री चालू करून व्यवसाय पुष्कळ वाढवला; मात्र बाबा नेहमी साधेपणाने रहायचे. स्वतःसाठी ऊंची वस्तू, कपडालत्ता ते घेऊ शकत होते; परंतु अंगभूत साधेपणामुळे त्यांनी स्वतःसाठी कधीच वायफळ व्यय केला नाही.

३ इ. निरपेक्ष : बाबांनी आमच्याकडून कधीच कुठलीही अपेक्षा केली नाही. शेवटपर्यंत त्यांनी दुकानाकडे देता येईल, तेवढे लक्ष दिले. मागील २ – ३ वर्षांत बाबांची प्रकृती पाहून आम्ही त्यांना दुकानाचा व्याप न्यून करण्याविषयी सुचवत होतो; परंतु ग्राहकांचा विचार करून ते म्हणायचे, ‘‘होईल, तोपर्यंत करायचे.’’ त्यांनी कधी ‘‘माझे पाय दाबा, माझे हे करा, ते करा,’’ असे कधीच सांगितले नाही. ते स्वतःचे सर्व स्वतःच करत असत.

३ ई. कुटुंबातील आनंदी वातावरण : आई-बाबा आणि आम्ही बहीण-भाऊ आमचे चौघांचे एकमेकांशी नाते पालक अन् मुले यांपेक्षा मैत्रीचे अधिक होते. दुःखी, हताश राहिलेले त्यांना आवडत नसे. ते सरळ, मनमिळाऊ, सकारात्मक, प्रेमळ, दिलदार आणि मोकळ्या स्वभावाचे होते. त्यामुळे आमच्या कुटुंबातील वातावरण आनंदी असे. वडिलांना त्यांचे आई-वडील आणि बहिणी यांच्याप्रतीही पुष्कळ प्रेम अन् आदर आहे.

३ उ. अल्प देहबुद्धी आणि निर्लेप मन : बाबांची देहबुद्धी अत्यंत अल्प होती. ते कुणाच्याही समवेत, कुठेही आणि कशाही परिस्थितीत राहू शकत होते. ‘असेच हवे, तसेच हवे’ असे त्यांचे कधीच नसे. ते कधीच कुणाविषयी माघारी बोलत नसत. आम्ही कधी एखाद्याविषयी त्यांना काही सांगितल्यावर ‘जाऊ दे, त्यांचे त्यांच्यापाशी’, असे म्हणून ते स्वतःच्या विश्वात मग्न होत असत.

३ ऊ. इतरांना विश्वास वाटणे : त्यांच्या मनात ‘कुणाचेही चांगले व्हावे’ हीच भावना अधिक असल्याने बाबांना कुणी काही विचारल्यास ते त्यांना मनापासून योग्य तो समुपदेश (सल्ला) द्यायचे. बाबांनी पुष्कळ लोकांना साहाय्यही केले. त्यामुळे लोकांनाही बाबांविषयी आदर होता. दुकानात येणारे ग्राहक केवळ बाबांच्या शब्दांवर विश्वास ठेवून निश्चिंत मनाने फळे घेऊन जात असत.

३ ए. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि सचोटीने व्यवसाय करणे’, यांमुळे व्यवसाय उत्तम चालणे; पण त्याविषयी कर्तेपणा नसणे: ते व्यवहारात चोख असल्याने बाजारामध्ये उत्तम दर्जाची फळे आल्यावर व्यापारी सर्वप्रथम ते बाबांना सांगायला आणि त्यांच्या समवेत व्यवहार करायला उत्सुक असत. फळव्यवसायामध्ये अन्य धर्मीय लोक अधिक आहेत. अन्य व्यवसायांप्रमाणे येथेही स्पर्धा वाढली आहे; पण ‘कामातील सचोटी, उत्तम दर्जा, पूर्वपुण्याई आणि सर्वात महत्त्वाचे, म्हणजे परम पूज्यांची कृपा’, यांमुळे फळांच्या क्षेत्रात आमच्या दुकानाचे नाव अग्रगण्य आहे. दुकानाचा विषय निघाल्यावर परम पूज्य नेहमी म्हणायचे, ‘ते आपले दुकान आहे.’ सांगलीत कुणी मोठे अधिकारी, संत, मान्यवर येणार असल्यास त्यांना लागणारी फळे आमच्या दुकानातून नेली जात. त्याचे श्रेय बाबा नेहमी आई-वडिलांची पुण्याई, संस्कार आणि देवाचा आशीर्वाद यालाच देत असत.

३ ऐ. वडिलांनी केलेली साधना : बाबांच्या जवळच्या एका मित्रामुळे ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी सांगितलेली उपासना करू लागले. त्यांची ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि कुलदेवी श्री आर्यादुर्गादेवी यांच्यावर पुष्कळ श्रद्धा होती.

३ ओ. आरंभी सनातन संस्थेविषयी असलेले मत पालटून श्रद्धा निर्माण होणे

३ ओ १. आरंभी वडिलांना सनातन संस्थेची साधना न पटणे; परंतु त्यांनी कधी विरोध न करणे : आरंभी बाबांना सनातन संस्थेची साधना पटत नसे; पण त्यांनी आमच्या साधनेला कधीच विरोध केला नाही. त्यांची प.पू भक्तराज महाराज यांच्यावर श्रद्धा होती.

३ ओ २. हळूहळू वडिलांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा बसणे : प्रथम माझ्या आईने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एक छायाचित्र घरी आणले. ‘ते घरात पटलावर ठेवलेले बाबांना आवडेल कि नाही ?’, या ताणाने ते छायाचित्र पटलावर ठेवण्याचे माझे आणि भावाचे धाडस झाले नाही; मात्र आईने प्रार्थना करून छायाचित्र पटलावर ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी आम्हाला परम पूज्य डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर प्रतिदिन फूल वाहिलेले दिसू लागले. देवांची पूजा केल्यानंतर बाबा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि परम पूज्य डॉक्टर यांच्या छायाचित्रांना फूल वहात असल्याचे आमच्या लक्षात आले. तेव्हा आम्हाला पुष्कळ आनंद झाला. हाच बाबांच्या साधनेचा आरंभ होता.

३ ओ ३. सनातन संस्थेप्रती श्रद्धा वाढून साधनेचे प्रयत्न चालू होणे : कालांतराने मी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी गेल्यावर बाबांचे आश्रमांत येणे-जाणे वाढले. घरात आईही साधनेविषयी बोलत असल्याने बाबांच्या मनात सनातन संस्थेप्रती आपुलकी, आदरभाव आणि श्रद्धा वाढली. त्यांच्या परीने तेही साधनेचे अधिक प्रयत्न करू लागले. ते परिचितांना माझी ओळख करून देतांना ‘ही रामनाथी आश्रमात सेवा करते’, असे मोठ्या अभिमानाने सांगून त्यांना ‘आश्रमात आवर्जून जाऊन या’, असे सुचवायचे.

३ ओ ४. संतांप्रती भाव असणे : बाबा कर्ममार्गी आणि भक्तीमार्गी होते. देवाला काही अर्पण करतांना त्यांचा भाव चांगला असे. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचे प्रसंग सांगताना अनेक वेळा बाबांचा चेहरा भावमय होऊन त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू येत असत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती त्यांच्या मनात पुष्कळ भाव आहे’, असे मला जाणवत असे.

३ ओ ५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले कौतुक ! : मी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी गेले, तेव्हा आई-बाबा मला काही म्हणाले नव्हते. आमचे (मी आणि भाऊ) निर्णय आम्हीच घेत असू. आई-बाबा आमच्या निर्णयाला पाठिंबा देत असत. हे परम पूज्यांना सांगितल्यावर ते २ – ३ वेळा मला म्हणाले होते, ‘‘तू भाग्यवान आहेस हो ! तुला असे आई-वडील मिळाले !’’

३ औ. वडिलांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१. बाबांचे पार्थिव घरी आणल्यावर ‘ते शांत झोपले आहेत’, असे वाटत होते. वातावरणात दाब जाणवत नव्हता. पुढील सर्व विधी गुरुदेवांच्या कृपेने व्यवस्थित पार पडले.

२. बाबांच्या निधनानंतर लावलेला दिवा १० व्या दिवशी पिठावरून उचलल्यानंतर दिवा ठेवलेल्या जागी पिठावर ‘ॐ’ उमटला होता. यांतून ‘बाबांच्या पुढील प्रवासात देव त्यांच्या समवेत असून त्याने आम्हा सर्वांनाच आश्वस्त केले’, असे मला जाणवले.

३. बाबांच्या निधनापूर्वी २ मास आम्ही तीर्थक्षेत्री गेलो होतो. बाबांच्या निधनानंतर याविषयी मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘देवाने बाबांना आधीच भरभरून चैतन्य दिले आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.’’

आम्हाला असे वडील दिल्यासाठी आम्ही परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो आणि आमच्याकडून आपल्याला अपेक्षित असे साधनेचे सर्व प्रयत्न होण्यासाठी प्रार्थना करतो.’

४. श्री. गणेश पेंढारकर (मेहुणा (पत्नीचा भाऊ), वय ६८ वर्षे), सावंतवाडी (सिंधुदुर्ग).

अ. ‘नागेश उपाख्य प्रदीप वडिलधार्‍या व्यक्तींशी नम्रतेने आणि आदरभावाने वागत असत. आपल्या मधुर वाणीने आणि आचरणाने त्यांनी लोकांना आपलेसे करून घेतले होते. त्यांना एकत्र कुटुंबाची आवड होती. त्यांच्या मनात कुणाविषयीही असूया किंवा द्वेष नव्हता.

आ. त्यांचा स्वभाव धाडसी होता. त्यांना कुठलेही काम करण्यास लाज वाटत नसे. मिळवलेल्या धनाचा त्यांनी काटकसरीने उपयोग केला. सचोटीने आणि निष्ठेने केलेल्या व्यवसायामुळे जनमानसांत त्यांना आदर आणि मानसन्मान मिळाला; पण त्यापासून ते अलिप्त राहिले.

इ. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. ते रामनामाचा जप करत असत. नंतर त्यांचा सनातन संस्थेशी संबंध आला. त्यांची प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरही नितांत श्रद्धा होती. विज्ञापने आणि अर्पण यांच्या माध्यमातून ते सेवारत होते.’

५. श्री. हृषिकेश कुलकर्णी (जावई) (वय ४३ वर्षे), पुणे

अ. ‘माझ्या सासर्‍यांना माणसांची पारख चांगली होती. त्यांची निरीक्षणक्षमता चांगली होती.

आ. स्वतःला होणार्‍या शारीरिक वा मानसिक त्रासाविषयी ते कधीच नकारात्मक बोलत नसत.’

६. श्री. मनोज कात्रे (पत्नीच्या बहिणीचा मुलगा – भाचा ) (वय ३२ वर्षे), पुणे.

अ. ‘त्यांनी कधीच कुणाविषयी गार्‍हाणे केले नाही’, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. तसा त्यांचा स्वभावच नव्हता. ते नेहमी ‘सर्व उत्तम चालू आहे आणि मी समाधानी आहे’, असे सांगत. ते नेहमी इतरांना साहाय्य करत. प्रतिदिन देवपूजा करून स्तोत्रे म्हटल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत.’

(सर्व लिखाणाचा दिनांक – सप्टेंबर २०२३)