पुन्हा पुन्हा सामाजिक कार्यकर्त्यांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
रत्नागिरी – शासनाने मागे घोषित केल्याप्रमाणे अजूनपर्यंत वानर आणि माकड यांच्या कायमचा बंदोबस्तासाठी शासन अन् प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शासनाला जाग आणण्यासाठी येत्या २५ जानेवारी या दिवशी सकाळी १० वाजता गोळप वडपिंपळ देवस्थानापासून रत्नागिरीपर्यंत पदयात्रा काढून पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि परिक्षेत्र वनअधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे कुटुंबासह आत्महत्येची अनुमती द्यावी, असे पत्र देणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे म्हणाले की
१. वानर-माकडांच्या प्रचंड उपद्रवामुळे शेती बागायती करतांना प्रचंड खर्च आणि कष्ट करून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासामुळे प्रचंड उद्विग्नता येते. हे असेच चालू राहिले, तर अजून एक- दोन वर्षात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेती, बागायती उद्ध्वस्त होणार आहे.
२. सरकारला अजूनही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावेसे वाटत नसल्याने निदान मला आत्महत्येची अनुमती द्यावी; म्हणजे वानर-माकडांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळेल.
३. ज्या शेतकर्यांना हा प्रचंड उपद्रव होत आहे त्यांनी पदयात्रेत सहभागी होऊन, तसे पत्र वरील कार्यालयात माझ्यासमवेत द्यावे. पत्राच्या कॉपी पदयात्रेत मिळतील. आपले नाव, गाव, पत्ता, भ्रमणभाष क्रमांक आणि सही करून पोचसाठी झेरॉक्स काढून द्यायचे आहे.
४. निद्रिस्त सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही पदयात्रा आहे. हा ‘मोर्चा किंवा रास्ता रोको’ आंदोलन नाही याचे सर्वानी भान ठेवावे. येणार्या सगळ्यांचे स्वागत आहे. या प्रश्नावर न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन विविध मार्गानी चालू राहील.