Ram Mandir Spiritual Tourism : श्रीराममंदिर भाविकांच्या संख्येत व्हॅटिकन आणि मक्का यांना मागे टाकणार !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर २३ जानेवारीपासून मंदिर सर्वसामान्यांसाठी उघडण्यात आले आहे. येथे प्रतिदिन १ लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. पुढील ६ महिन्यांत हा आकडा २ कोटींवर पोचेल. यामुळे अयोध्या अमृतसरचे सुवर्ण मंदिर आणि आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर यांना भाविकांच्या संख्येमध्ये मागे टाकेल.

प्रतिवर्षी साडेतीन कोटी लोक सुवर्ण मंदिराला भेट देतात, तर ३ कोटी लोक तिरुपती मंदिराला भेट देतात. जागतिक स्तरावर, व्हॅटिकन सिटीला प्रतिवर्षी अंदाजे ९० लाख लोक भेद देतात आणि सौदी अरेबियातील मक्का येथे अंदाजे २ कोटी लोक येतात. अयोध्या पुढील एका वर्षात जगातील सर्वांत प्रमुख धार्मिक पर्यटन क्षेत्रांना मागे टाकेल. यामुळे अयोध्येत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. श्रीराममंदिराच्या उभारणीमुळे अयोध्या हे एक मोठे आर्थिक केंद्र बनेल. उत्तरप्रदेश सरकारला श्रीराममंदिरामुळे वर्ष २०२५ मध्ये २५ सहस्र कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.