Ram Mandir Ayodhya : पुढील १ सहस्र वर्षांचा पाया या प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र क्षणानंतर आपल्याला रचायचा आहे !

अयोध्येतील कार्यक्रमाचा इतिवृत्तांत वाचा !

श्री रामललांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की,

सौजन्य : DD News
 • शेकडो वर्षांच्या असंख्य बलीदानांनंतर आपले प्रभु श्रीराम आले आहेत.
 • ईश्वरी चैतन्य अनभुवले. किती सांगण्यासारखे आहे, परंतु कंठ मला ते सांगू देत नाही. माझे शरीर अजूनही स्पंदनांनी भारलेले आहे. त्या क्षणात चित्त अजूनही लीन आहे.
 • आपले रामलला आता तंबूत रहाणार नाहीत. दिव्य मंदिरात रहाणार.
 • माझी अपार श्रद्धा आहे की, आज जे काही घडले आहे, त्याची अनुभूती देश आणि विश्वातील कोपऱ्याकाेपऱ्यांत रामभक्तांना आली असणार.
 • २२ जानेवारी २०२४ हा दिनदर्शिकेतील दिनांक नाही, तर एका नव्या कालचक्राचा प्रारंभ आहे.
 • आज आपल्याला शेकडो वर्षांच्या धैर्याची पूर्णता मिळाली आहे.
 • आजपासून १ सहस्र वर्षांनंतरही आजच्या या क्षणाची चर्चा होईल. केवढी मोठी ही रामकृपा आहे की, आपण सर्वजण हे साक्षात्‌ पहात आहोत, अनुभवत आहोत.
 • आज सर्व दिशा दिव्यतेने पूर्ण आहेत.
 • मी प्रभूंची क्षमायाचना करतो की, आम्ही कुठेतरी कमी पडलो की, शेकडो वर्षे आम्ही मंदिर बांधू शकलो नाही. आज मला वाटते की, प्रभु श्रीराम आपल्याला अवश्य क्षमा करतील.
 • प्रभूंच्या आगमनाने मोठ्या वियोगाचा अंत झाला. त्रेतायुगात १४ वर्षांचाच वियोग होता. या कलियुगात शेकडो वर्षांचा वियोग सहन करावा लागला.
 • अनेक दशके श्रीरामाच्या अस्तित्वाला घेऊन कायदेशीर लढा लढावा लागला. मी न्यायपालिकेचा आभारी आहे की, तिने न्याय केला.
 • आज सायंकाळी घराघरांत रामज्योती प्रज्वलित केली जाईल.
 • आता कालचक्र परत फिरणार आहे.

 • भारताच्या कणाकणांत श्रीराम विराजले आहेत. हाच एकात्म भाव आम्हा स‍र्वांत आहे.
 • मला विविध भाषांत रामायण ऐकण्याचे सौभाग्य लाभले आहे. गेले ११ दिवस मी हे ऐकले.
 • राम सर्वत्र सामावले आहेत, प्रत्येक युगात लोकांनी रामाला अभिव्यक्त केले आहे. हा रामरस जीवनप्रवाहासारखा सातत्याने वाहत आला आहे. लोक रामरसाचे आचमन करत आले आहेत.
 • रामाचे आदर्श, मूल्य, शिक्षा सर्वत्र एकसमान आहे.
 • असंख्य कारसेवक, रामभक्त, साधू-संत यांचे आपण ऋणी आहाेत.
 • हा भारतीय समाजाच्या परिपक्वतेच्या बोधाचाही क्षण आहे. हा क्षण केवळ विजयाचाच नाही, तर विनयाचाही आहे.
 • राममंदिर बनले, तर आग लागेल, असे काही लोक म्हणायचे. राममंदिराची उभारणी भारतीय समाजाची शांती, धैर्य आणि समन्वय यांचे प्रतीक आहे.
 • हे निर्माण आगीला नव्हे, तर ऊर्जेला जन्म देत आहे.
 • राममंदिर उज्वल भविष्याची निर्मिती करणार आहे.
 • राम आग नाही, तर ऊर्जा आहे. राम विवाद नाही, तर समाधान आहे.
 • राम वर्तमानच नाहीत, तर ते अनंत काळ आहेत.
 • संपूर्ण विश्व या राम प्राणप्रतिष्ठेशी जोडला आहे.
 • श्री रामललांची ही प्रतिष्ठा वसु‌धैव कुटुम्बकमची प्रतिष्ठा आहे.
 • भारतीय संस्कृतीवरील विश्वासाची आणि सर्वोच्च आदर्शांची ही प्राणप्रतिष्ठा आहे.
 • याची संपूर्ण विश्वालाही आवश्यकता आहे. ‘सर्वेत्र सुखिन:..’ ची ही अनुभूती आहे.
 • हे केवळ मंदिर नव्हे, तर भारतीय दृष्टी, दर्शन, दिक्दर्शनाचे हे मंदिर आहे.
 • राम हा भारताचा विचार, चिंतन, प्रतिष्ठा, प्रताप, प्रभाव, नीती, नित्यता, निरंतरता, व्यापक, विश्व, विश्वात्मा आहे.
 • त्यामुळे रामाचा प्रभाव केवळ काही वर्षांसाठी नाही, तर सहस्रो वर्षांसाठी होतो.
 • श्रीरामाने १० सहस्र वर्षे राज्य केले.
 • शेकडो वर्षांची प्रतीक्षा संपली, आता पुढे काय ? असा प्रश्न आहे.
 • दैवी आत्म्यांना तसेच परतायला सांगणार का ? तर नाही.
 • हीच योग्य वेळ आहे. पुढील १ सहस्र वर्षांचा पाया आज रचायचा आहे.
 • समर्थ, सक्षम, पवित्र, भव्य, दिव्य भारताची निर्मिती करायची आहे.
 • आपल्याला आपल्या अंत:करणाला विस्तारावे लागेल.
 • प्रत्येक भारतीयातील समर्पण यासाठी आवश्यक असणार आहे.
 • हाच तर देवापासून देश आणि रामापासून राष्ट्राच्या चैतन्याचा ‍विस्तार आहे.
 • मी तर पुष्कळ सामान्य आहे, छोटा आहे, असे कुणी विचार करत असेल, तर त्याला खारीची आठवण झाली पाहिजे.
 • आपण संकल्प करूया की, आपल्या जीवनातील क्षणन्‌क्षण, शरिरातील कणन्‌कण देशासाठी, रामासाठी समर्पित करू.
 • आपली पूजा समष्टीसाठी असली पाहिजे.
 • युवा ऊर्जेने भारत भारला आहे. ही सकारात्मक परिस्थिती परत केव्हा येईल, हे ठाऊक नाही. हा भारताचा अमृतकाळ आहे. आपण त्या १ सहस्र वर्षांचा पाया रचणार आहोत.
 • भारतीय उत्कर्ष, उदय, भव्य भारताच्या अभ्युदयाचे हे मंदिर साक्ष बनेल.
 • सामूहिक प्रयत्न केल्यास सर्वकाही शक्य आहे. मंदिर त्याचे उदाहरण आहे.
 • सर्व संतांच्या चरणी माझा प्रणाम !
 • सियावर रामचंद्र की जय !

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष पू. गोविंददेवगिरीजी महाराज यांनी भाषण करतांना म्हटले की,

पू. गोविंददेवगिरीजी महाराज
 • पंतप्रधानांच्या मंगल हातांनी श्रीरामरायाची प्राणप्रतिष्ठा झाली.
 • २० दिवसांपूर्वी मला समजले की, पंतप्रधानांना स्वत:ला अनुष्ठान करावे लागेल. तपश्चर्येनेच मनाची शुद्धी होते.
 • पंतप्रधानांनी ३ दिवस नाही, तर संपूर्ण ११ दिवस तप केले. आपण एकभुक्त राहिला. असा तपस्वी राष्ट्रीय प्रमुख कुणी नाही. नाशिक, गुरुवायूर, रामेश्वरम आदी ठिकाणी अनुष्ठान केले. ३ दिवस भूमीशयन सांगितले होते, आपण ११ दिवस भूमीशयन केले.
 • भारतीय संस्कृतीचा मूळ शब्द हा तप ! त्या तपाला आपल्यात साकार केले. असा तप केलेल्या एकच राजाचे मला नाव आठवते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! या वेळी पू. गोविंददेवगिरीजी महाराज भा‍वुक झाले.

या वेळी व्यासपिठावर पंतप्रधानांसमवेत प.पू. सरसंघचालक, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, योगी आदित्यनाथ, श्रीरामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदासजी महाराज आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चंपत राय यांनी केले.

. . . त्यानंतर पंतप्रधानांनी उपवास सोडला !

सौजन्य : DD News

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी पंतप्रधान मोदी आणि प.पू. सरसंघचालक यांना श्रीराममंदिराची चांदीची प्रतिकृती दिली भेट !

यानंतर झालेल्या भाषणात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी म्हणाले की,

बहुसंख्यांक समाजाने इतकी वर्षे आणि इतक्या स्तरांवर संघर्ष केल्याचे इतिहासातील हे एकमेव उदाहरण असेल !

सौजन्य : DD News
 • आजच्या दिवसाला शब्दांमध्ये व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील ! प्रत्येकाच्या मनात रामनाम आहे. रोमारोमांत राम-राम रमला आहे. आज रघुनंदन रामलला सिंहासनावर विराजले आहेत.
 • भारताला याच दिवसाची प्रतीक्षा होती. यासाठी ५ शतके लागली. अनेक पिढ्यांनी यासाठी लढा दिला.
 • अंतत: तो शुभ प्रसंग आला, ज्यामुळे कोटी-कोटी मनांची मनोकामना पूर्ण झाली.
 • मंदिर वहीं बनाएंगे, हे स्वप्न साकार झाले आहे. धन्य आहेत ते शिल्पकार, ज्यांनी आपल्या मनाच्या प्रभुला मूर्तीत साकारले आहे.
 • आपली पिढी भाग्यवान आहे की, ज्यांना हा क्षण पाहायला मिळाला. अन्‌ ती पिढी अधिक भाग्यवान, जिने यासाठी सर्वस्व अर्पिले.
 • भव्य-दिव्य श्रीराममंदिराच्या उभारणीत ज्यांनी याेगदान दिले, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो.

या वेळी त्यांनी रामनगरी अयोध्येतील चालू असलेल्या कार्यांची माहितीही दिली.

प.पू. सरसंघचालक आपल्या भाषणात म्हणाले की,

सौजन्य : DD News
 • रामललासह भारताचे ‘स्व’ परतले आहे.
 • भारतभरात उत्साह आणि आनंद आहे.
 • शेकडो वर्षांच्या संघर्षाचा अभ्यास करणारी व्यक्ती राष्ट्रासाठी निश्चितच क्रियाशील होईल.
 • पंतप्रधानांनी तप केले. आता रामराज्य आणण्यासाठी आपण जनतेनेही तप केले पाहिजे.
 • एकमेकांत समन्वय करणे, करुणा, सेवा, परोपकार, पवित्रता, संयमाने कार्य करणे यांसाठी आता आपण सर्वजण झटूया.
पंतप्रधानांची कार्यक्रमाच्या वेळची एक मुद्रा ! (सौजन्य : DD News)